अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्या : भाजपची मागणी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्या : भाजपची मागणी
–मासिक आढावा बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा
कोपरगाव : अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पश्चिम भागातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळालेली आहे; परंतु पूर्व भागातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. पूर्व भागातील तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने कोपरगाव येथील तहसीलदारांकडे करण्यात आली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालयात मासिक आढावा बैठक आयोजित केली जाते. त्यानुसार आज सोमवारी (८ मे २०२३) भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, विविध गावांचे सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार पी. डी. पवार व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना भेटून विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यावर पवार व सूर्यवंशी यांनी हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, विलासराव माळी, माजी संचालक मधुकर वक्ते, बाबासाहेब नेहे, निखील औताडे, किशोर शिंदे, सचिन औताडे, जालिंदर थोरात, कैलास वक्ते, संजय वक्ते, भाऊसाहेब वक्ते, नितीन पाचोरे, माहेगाव देशमुखचे माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, शिंगणापूरचे सरपंच डॉ. विजय काळे, आपेगावचे सरपंच किसनराव गव्हाळे, खिर्डी गणेशचे सरपंच चंद्रकांत चांदर, धारणगावचे दीपक चौधरी, तिळवणीचे सरपंच पिराजी शिंदे, बहादरपूरचे कैलास रहाणे, शरद गडाख, शरद वाघ, राजेंद्र पगार, भाजप दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, विकास निकम, अशोक गवारे, प्रकाश भाकरे, जयराम वारकर, कचेश्वर आहेर, कचरू भाटे, प्रदीप चव्हाण, विजय कुऱ्हे, हेमंत निकम, मुरलीधर वाकचौरे, नारायण लोहकणे,पोपटराव पवार, रमेश क्षीरसागर, नंदकुमार रक्ताटे, विठ्ठल सानप, निवृत्ती सानप, निलेश सानप, रामदास शिंदे, संदीप गुरुळे, प्रकाश दवंगे, बापूसाहेब पवार, सुरेश चंदनशिव, सर्जेराव कुऱ्हाडे, बबनराव राजगुरू, राजेंद्र शेळके आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

गतवर्षी २०२२ मध्ये कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे; पण कोपरगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे होऊनही अद्याप अतिवृष्टीचे अनुदान वाटप झाले नाही. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाचे वाटप त्वरित करावे, कोकमठाण व परिसरातील ब्रिटीशकालीन वितरिकांची (चाऱ्या) तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पाटपाणी उपलब्ध करून द्यावे, गणेश बंधाऱ्यात पाणी सोडून बंधारा भरून द्यावा, गेल्या एक महिन्यापासून तहसील कार्यालयात शिधापत्रिका शिल्लक नसल्याने शिधापत्रिका त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, माहेगाव देशमुख येथे इंदिरानगरमध्ये गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले. पंचनामे होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, ती त्वरित द्यावी, उक्कडगाव व नांदगाव शिवरस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, जेऊर कुंभारी शिवारातील बेकायदा वाळू उपसा बंद करावा, ब्राह्मणगाव येथे सहाचारी परिसरात अवकाळी पावसाने बाभळीचे झाड कोसळून मृत पावलेल्या दत्तात्रय संजय मोरे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्यावी, ब्राह्मणगाव येथील शाळेजवळील विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून, तात्काळ वीज जोडणी करावी, घारी व डाऊच (बु.) येथे स्वतंत्र तलाठी सज्जा व्हावा, घारी येथे रेशन वाटप अनियमित होत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार स्वस्त धान्य दुकानदार बदलावा, भोजडे चौकी ते कोपरगाव व पाथरे ते कोपरगाव या एस. टी. बसला अधिकृत थांबा देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी आदी मागण्या नायब तहसीलदार पवार यांच्यासमोर मांडण्यात आल्या.मुर्शतपूर येथील आरोग्य सेवा केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षे उलटली असली तरी अद्यापही तेथे रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने हे आरोग्य सेवा केंद्र त्वरित कार्यान्वित करून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, धारणगाव येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने दरवर्षी पावसाचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, हे थांबविण्यासाठी तात्काळ नाल्यांचे बांधकाम करून उपाययोजना करावी, आपेगाव येथील जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर असलेल्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे बंद असलेले काम त्वरित सुरू करावे, बहादराबाद येथील स्मशानभूमी सुशोभीकरण अंतर्गत रस्त्यासाठी निधी द्यावा, खिर्डी गणेश येथे जलजीवन मिशनअंतर्गत ९६ लाख १५ हजार ९७९ रुपये निधी मंजूर असून, वाढीव निधीसाठी दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करून तातडीने निधी द्यावा, याच गावातील जि. प. शाळेच्या दोन वर्गखोल्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे, कासली येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाईपलाईनचे बंद असलेले काम त्वरित सुरू करावे, गरजूंना शासनाच्या योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून द्यावे, शहापूर येथील ओसपांढरी बंधाऱ्याचे सांडपाणी मूळ प्रवाहाद्वारे काढण्याचे काम सुरू करावे आदी मागण्या गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आल्या.



