महाराष्ट्रराजकिय
शेतकऱ्यांसह सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक व क्रांतिकारी अर्थसंकल्प -स्नेहलताताई कोल्हे
शेतकऱ्यांसह सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक व क्रांतिकारी अर्थसंकल्प -स्नेहलताताई कोल्हे
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर व ‘सर्वजन हिताय’ या संकल्पनेवर आधारित आणि सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, शेतमजूर,कामगार, उद्योजक, युवक, महिला अशा सर्व क्षेत्रातील लोकांचा व समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करण्यात आलेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबविण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली.

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. हा अर्थसंकल्प गरीबांचे, कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा आहे. या अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गीय. शेतकरी, महिला, कामगार, युवकांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि राहणीमान सुलभ करण्यासाठी पावलं उचलली आहेत. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व समाज घटकांचा विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती-सक्षम, कुशल रोजगार युवा व पर्यावरणपूरक विकास अशा पाच ध्येयांवर आधारित हा अर्थसंकल्प आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आणखी सहा हजार रुपयांची भर घालणार असून, आता शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार नव्हे तर १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा लाभ १ कोटी १५ शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२४-२४ वर्षासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत पीकविमा देण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ३१२ कोटी रूपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. २०१६ च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले असून, २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात येणार आहे. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण,शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देण्यात येणार असून, सरकार या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार महाकृषी विकास अभियान राबविणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी आगामी तीन वर्षात ३० टक्के वीज वाहिन्यांचे सौरउर्जेत रुपांतर करण्यात येणार आहे. याचा सुमारे ९.५० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पंतप्रधान कुसुम योजनेतून पुढील वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.महिलांच्या विकासासाठी अनेक योजना फडणवीस यांनी जाहीर केल्या आहेत. राष्ट्राची प्रगती महिला सक्षमीकरणातून केली जाते. त्यासाठी चौथे महिला सक्षमीकरण धोरण जाहीर करण्यात येणार आहे. बचत गटांनाही यंदाच्या अर्थसंकल्पातून आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, चौथीत ४ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये, आठवीत ८ हजार रुपये तर १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. एसटी बस प्रवासात महिलांना सरसकट ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिली जाणार आहे. १५ वर्षांपर्यंत महिलेला पुरूष घटकास विक्री करता येत नाही ती अट आता शिथिल करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा स्वागतार्ह अर्थसंकल्प -विवेकभैय्या कोल्हे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, कामगार, विद्यार्थी, उद्योजक, अंगणवाडी सेविकांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधा, कृषी, पर्यावरण, पर्यटन विकासावर भर देणाऱ्या या अर्थसंकल्पाला ‘ग्रोथ बजेट’ तसेच ‘ग्रीन बजेट’ म्हणता येईल. या अर्थसंकल्पामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांसाठी ५३ हजार ५८ कोटींची तरतूद केली आहे. तसेच रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव निधीची तरतूद सरकारने केली आहे. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून, राज्यातील सहा विमानतळाचा विकास करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी ५२७ कोटी, छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ते म्हणाले, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेचा लाभ घेऊन नागरिकांना १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत होते. ही मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. नव्या २०० रुग्णालयांचा यात समावेश होणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात अडीच लाख रुपयांवरून ४ लाख इतकी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असणाऱ्या गरीब लोकांना मोठा लाभ मिळणार आहे.
पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये ५ हजारांची वाढ करण्यात आली असून, सरकारी शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना आता गणवेश मोफत मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुण्यातील आंबेगाव (ता. हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानास ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी २५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारले जाणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शिवकालीन ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा आहे, असे विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या समृद्धी महामार्गाचा आता दुसऱ्या टप्प्यात विस्तार होणार आहे. सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता बांधण्यात येईल. शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या माहूर, तुळजापूर, अंबाजोगाई ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही तीर्थस्थळेदेखील जोडले जाणार आहेत.


