रब्बी हंगामातील नैसर्गिक आपत्तीच्या लाभासाठी ई – पीक पाहणी करून घ्यावी – परजणे
रब्बी हंगामातील नैसर्गिक आपत्तीच्या लाभासाठी ई – पीक पाहणी करून घ्यावी – परजणे
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव:-रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या पिकांचा पीक विमा तसेच इतर सवलतींचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपापल्या अँड्रॉइड मोबाईलवर पीक पाहणीॲप डाऊनलोड करून ई – पीक पाहणी तातडीने करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.माहे आक्टोंबर २०२३ पासून रब्बी हंगामास सुरुवात झालेली आहे. सर्व शेतक-यांना यापुढे आॅनड्रॉईड मोबाईलवर पीक पाहणी अॅप डाऊनलोड करून रब्बी हंगामातील पिकांची पीक पाहणी करावयाची आहे. ई- पीक पाहणी केल्यामुळे शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास पीक विमा व इतर सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेला मदत होते. त्यामुळे सर्व शेतक-यानी ई-पीक पाहणी करणे हितावह आहे.

ऑनलाईन पीक पाहणीबाबत शेतकरी बांधवांना पुरेशी माहिती नसल्यामुळे कोपरगाव तहसील कार्यालयातर्फे ” चला शेतात जाऊ या, पीक पाहणी करुया ” हा एक दिवसीय अभिनव उपक्रम शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी राबविण्यात येणार आहे. या दिवशी कोपरगांव तालुक्यातील सर्व गावांमध्ये एकाच वेळी ई-पीकपाहणी करण्यात येणार आहे. याकामी तालुक्यातील नायब तहसीलदार, सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक हे गावी हजर राहून खातेदारांना ई – पीक पाहणी अॅप कसा डाऊनलोड करावा व कशा पध्दतीने ई – पीक पाहणी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून ई – पीक पाहणी करणेत मदत करणार आहे.

शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतात हजर राहून पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन शिर्डी उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी, व कोपरगांवचे तहसीलदार यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बाधवांनी आपल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर ई – पीक पाहणी अॅप घेवून पीक पाहणी करावी. तसेच अडचण असल्यास आपल्या गावचे तलाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री परजणे पाटील यांनी केले आहे.
