सिताराम खंडागळे यांची बाभळेश्वर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या मानद सचिवपदी बिनविरोध निवड

सिताराम खंडागळे यांची बाभळेश्वर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या मानद सचिवपदी बिनविरोध निवड
बाभळेश्वर : महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थांपैकी एक असलेल्या वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या., बाभळेश्वरच्या मानद सचिवपदी श्री. सिताराम भीमराव खंडागळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या चेअरमनपदी श्री. पांडुरंग किशन पोटे, तर व्हाइस चेअरमनपदी श्री. रविकिरण गणपत कानडे यांची निवड झाली.

दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया प्रशासकीय अधिकारी दुय्यम निबंधक कार्यालय राहता मुख्य लिपिक श्री. संदीप कोठुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या निवड प्रक्रियेत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याने सभासदांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

श्री. सिताराम भीमराव खंडागळे हे महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून, त्यांनी आपल्या सेवाकाळात तांत्रिक कामासोबतच कर्मचारी हित, संघटनात्मक कार्य आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे अहिल्यानगर सर्कल पदाधिकारी म्हणून त्यांनी संघटनात्मक जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली आहे. संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची संस्थेच्या मानद सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडप्रसंगी स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस श्री. जालिंदर पांढरे, तांत्रिक कामगार संघटना ५०५९ चे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. सतीश भुजबळ, तांत्रिक कामगार युनियन १०२९ चे केंद्रीय अध्यक्ष श्री. नितीन पवार, तसेच वर्क्स फेडरेशन संघटनेचे ज्येष्ठ नेते श्री. सदाशिव भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.संस्थेच्या सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे सहकार्य आणि सर्वांच्या एकजुटीच्या बळावर संस्थेची आर्थिक पारदर्शकता, आर्थिक शिस्त, सभासदांचे हित आणि संस्थेची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.या निवडीबद्दल नवनिर्वाचित चेअरमन श्री. पांडुरंग किसन पोटे, व्हाइस चेअरमन श्री. रविकिरण गणपत कानडे आणि मानद सचिव श्री. सिताराम भीमराव खंडागळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुका प्रतिनिधी. इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख



