गोमाता आणि हिंदू चिन्हांची विटंबना करणाऱ्या ‘गायछाप’ व ‘ओम पंढरपुरी’ तंबाखू कंपन्यांना प्रशासनाचा वरदहस्त; १६ जुलैपासून कोपरगावात ‘आरपारची लढाई’, बेमुदत धरणे आंदोलन!


गोमाता आणि हिंदू चिन्हांची विटंबना करणाऱ्या ‘गायछाप’ व ‘ओम पंढरपुरी’ तंबाखू कंपन्यांना प्रशासनाचा वरदहस्त; १६ जुलैपासून कोपरगावात ‘आरपारची लढाई’, बेमुदत धरणे आंदोलन!
कोपरगाव:महाराष्ट्र शासनाने ज्या गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून सर्वोच्च दर्जा दिला, त्याच गोमातेचे चित्र आणि नाव ‘गायछाप’ तंबाखू सारख्या कॅन्सरजन्य, थुंकण्याच्या आणि विषारी पदार्थावर छापून कोट्यवधी हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत. तसेच ‘ओम पंढरपुरी तंबाखू’ च्या माध्यमातून पवित्र ‘ओम’ आणि वारकरी संप्रदायाचे महातीर्थ ‘पंढरपूर’च्या नावाचा नफेखोरीसाठी अत्यंत घृणास्पद व्यावसायिक वापर सुरू आहे. या तीव्र विटंबनेच्या विरोधात ‘माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटना आणि कोपरगाव तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने १६ जुलै २०२६ पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा अंतिम आणि गर्भित इशारा देण्यात आला आहे.

या अत्यंत संवेदनशील आणि धार्मिक भावना दुखावणारे प्रकरण समोर आल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी (SDO) शिर्डी यांनी २१/०४/२०२६ रोजी आणि मा. जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांनी २९/०५/२०२६ रोजी संबंधित कंपन्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आदेश स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला (FDA) दिले होते. परंतु, महिने उलटून गेले तरी स्थानिक कोपरगाव पोलीस आणि FDA विभागाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना थेट केराची टोपली दाखवणाऱ्या या स्थानिक प्रशासनाचे तंबाखू कंपन्यांशी नेमके काय ‘अर्थपूर्ण’ संबंध आहेत? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. प्रशासनाचा हा ढिसाळ आणि संशयास्पद कारभार थेट गुन्हेगारांना पाठीशी घालणारा आहे.

हा प्रकार केवळ धार्मिक भावना दुखावणारा नसून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ व ३०२, ट्रेडमार्क कायदा १९९९ आणि कोटपा कायदा २००३ (COTPA) अंतर्गत गंभीर दखलपात्र गुन्हा आहे. शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने वारंवार पाठपुरावा करूनही जर प्रशासन हातावर हात धरून बसणार असेल, तर जनतेचा संयम आता संपला आहे.प्रशासनाला ही अंतिम नोटीस मिळाल्यापासून पुढील ७ दिवसांच्या आत संबंधित तंबाखू कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून, बाजारातील आक्षेपार्ह पाकिटे जप्त करण्याचे लेखी आदेश जारी करावेत. ही कारवाई न झाल्यास, १६ जुलै २०२६ पासून कोपरगाव तहसील समोर ‘करो या मरो’ या भूमिकेतून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाईल.या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा कोणत्याही आंदोलकाच्या जीवितास बरे-वाईट झाल्यास, त्याची संपूर्ण कायदेशीर, फौजदारी आणि नैतिक जबाबदारी कोपरगाव तहसील प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांचीच राहील असे.आंदोलक:श्री. विनय भगत, श्री. मयूर आव्हाड, श्री. अमित आढाव, श्री. विजय जाधव
(व ‘माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटना) यांनी म्हटले आहे



