ब्रेकिंग

कोपरगावात ६ डिसेंबरला भव्य सर्वसमाजीय वधू-वर परिचय मेळावा, योगायोग जमलं तर पहा..

कोपरगावात ६ डिसेंबरला भव्य सर्वसमाजीय वधू-वर परिचय मेळावा, योगायोग जमलं तर पहा..
विवाहयोग्य तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांचे आवाहन
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी कोपरगाव येथे भव्य सर्वसमाजीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.विवाहयोग्य तरुण-तरुणींना एकत्र आणून त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे आणि योग्य जोडीदार निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विवाहयोग्य तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.
यावेळी या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना मा. आ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, अविवाहित तरुण-तरुणींची वाढती संख्या हा समाजासमोरील चिंतेचा विषय बनला आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी स्थायिक होण्याचे वाढते प्रमाण, विवाहाच्या वेळी दोन्ही बाजूंकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा तसेच हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांमुळे विवाह जुळविण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्याही काही घटना निदर्शनास येतात. पूर्वी नातेवाईक, परिचित आणि समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून विवाहयोग्य स्थळे सुचवली जात होती. मात्र, बदलत्या परिस्थितीत योग्य स्थळ शोधणे कठीण झाले आहे.विवाह जुळविताना मुला-मुलींनी एकमेकांना समजून घेणे, अवास्तव अपेक्षा टाळणे आणि हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांना समाजातून हद्दपार करणे गरजेचे आहे. समाजात काम करताना अनेक पालकांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह जमत नसल्याची चिंता व्यक्त केली. त्यातूनच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विवाहयोग्य तरुण-तरुणींना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे हे समाजासाठी पुण्याचे काम ठरेल, असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांसह सर्व कार्यकर्ते सहकार्य करणार आहेत. आपल्या परिचयातील विवाहयोग्य वधू-वरांच्या कुटुंबीयांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.हा मेळावा रविवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे होणार आहे.
मेळाव्यासाठी मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ऑनलाइन नोंदणीसाठी क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणीची अंतिम मुदत ३ डिसेंबर २०२६ आहे. प्रत्यक्ष नोंदणीसाठी आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तसेच गणप्रमुख आणि विभागप्रमुखांकडे नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.कोपरगाव मतदार संघासह जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मांतील विवाहयोग्य तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे