ब्रेकिंग

एन.एच.७५२-जी कोपरगाव-मालेगाव महामार्ग कोपरगाव हद्दीत; चार पदरीच व्हावा, हीच माझी भूमिका-आ. आशुतोष काळे

एन.एच.७५२-जी कोपरगाव-मालेगाव महामार्ग कोपरगाव हद्दीत; चार पदरीच व्हावा, हीच माझी भूमिका-आ. आशुतोष काळे

कोपरगाव  वार्ताहर :- कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव या ७६ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी कोपरगाव-मालेगाव महामार्गाच्या सहापदरीकरणाची चर्चा सुरू असली, तरी कोपरगाव तालुका हद्दीत हा महामार्ग पूर्वीच्या मंजुरीनुसार चार पदरीच व्हावा, ही माझी ठाम भूमिका आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन आग्रही मागणी करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी कोपरगाव-मालेगावच्या सहापदरीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.२४) रोजी कोपरगाव शहरातील क्रेडाईचे सदस्य, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, व्यापारी तसेच आजी-माजी नगरसेवक यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत स्थानिक नागरिक, व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय व्हावा, अशी भूमिका मांडली.

अहिल्यानगर आणि मालेगाव या प्रमुख शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोपरगाव शहर व तालुका हद्दीत या महामार्गालगत शाळा-महाविद्यालये, दूध संघ, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, गॅरेज, विविध लहान-मोठे व्यवसाय, मंदिरे तसेच नागरिकांनी विकसित केलेले बिगरशेती प्लॉट आहेत. त्यामुळे महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यास अनेक नागरिक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तांवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक परिस्थिती आणि या घटकांचे हित लक्षात घेता एन.एच.७५२-जी कोपरगाव-मालेगाव महामार्ग कोपरगाव हद्दीत सहापदरीकरणाऐवजी चार पदरी महामार्गच योग्य ठरेल.सध्या ७५२-जी महामार्ग कोपरगाव ते मनमाड दरम्यान दोन पदरी, तर कोपरगाव ते अहिल्यानगरदरम्यान चार पदरी आहे. येवला व मनमाड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपुलाचा पर्याय होवू शकतो अशी सूचना आमदार काळे यांनी केली.

एन.एच.७५२-जी कोपरगाव ते सावळीविहीर फाट्याप्रमाणेच कोपरगाव तालुका हद्दीपर्यंतचा महामार्ग पूर्वीच्या मंजुरीनुसार चार पदरी सिमेंट काँक्रिटचा व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन मागणी करणार आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, हीच माझी भूमिका असून कोपरगाव हद्दीत ७५२-जी महामार्ग चार पदरीच व्हावा, यासाठी ठामपणे पाठपुरावा करणार आहे, असे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे