महाराष्ट्र

कोपरगावच्या उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन निर्मिती करावी -बिपीनदादा कोल्हे

कोपरगावच्या उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन निर्मिती करावी -बिपीनदादा कोल्हे

कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत नूतन सामाजिक सभागृहाचे व आर. ओ. वॉटर प्लांटचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते थाटात लोकार्पण

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव : भौगोलिकदृष्ट्या नागपूर शहर हे भारताच्या केंद्रस्थानी आहे. पूर्व भारत आणि पश्चिम भारत या दोन भागांचा म्हणजे कोलकाता साईड व मुंबई साईड असा विचार केला, तर पश्चिम भारताच्या-मुंबईच्या बाजूने कोपरगाव हा केंद्रबिंदू आहे. विकासाला गती देणारा समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून गेला असून, मनमाड-दौंड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाले आहे. या भागात रस्ते, रेल्वे, विमानसेवेमुळे कनेक्टीव्हिटी वाढली असून, दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. कोपरगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी याचा फायदा घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन निर्मिती करावी व जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवावा. यासाठी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.कोपरगाव येथील औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नाने शासनाच्या सन २०१८-१९ मधील ग्रामविकास निधीतून बांधलेल्या नूतन सामाजिक सभागृहाचे व आर. ओ. वॉटर प्लांटचे उद्घाटन तथा लोकार्पण बुधवारी (७ जून) स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बिपीनदादा कोल्हे बोलत होते.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

यावेळी औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीचे तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) व गोदावरी सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश आबा परजणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाविस्कर (अहमदनगर), संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. वर्पे, कोपरगावचे उपविभागीय अभियंता व्ही. बी. शिंदे, प्रशांत वाकचौरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक कैलास ठोळे, औद्योगिक सहकारी वसाहतचे माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे, विद्यमान उपाध्यक्ष मुनिश ठोळे, संचालक पराग संधान, केशवराव भवर, अनिल सोनवणे, रवींद्र नरोडे, रोहित वाघ, सुकृत शिंदे, पंडितराव भारूड, सोमनाथ निरगुडे, माजी संचालक वसंतराव देशमुख, जयवंतराव जाधव, बाबासाहेब परजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खंडू फेफाळे, संवत्सरचे दिलीप ढेपले, बाळासाहेब दहे पाटील, कंत्राटदार रिंकेश नरोडे, उद्योजक नरेंद्र कुर्लेकर, हाशमभाई पटेल, सुनील शहा, ओमप्रकाश बज, आदित्य शिंगी, अमित शहा, नारायण वाडेकर, सागर शहा, चैतन्य जगदाळे, पप्पू वाडेकर, संतोष जोर्वेकर आदींसह उद्योजक, कारखानदार, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे तर आभार प्रदर्शन पंडितराव भारूड यांनी केले.विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रमुख अतिथी व उपस्थितांचे स्वागत करून कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून आजपर्यंत केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते व अन्य विकासकामांसाठी मोठा प्रमाणात निधी आणला. त्याचबरोबर उद्योजकांना वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीत ५ एमव्हीए क्षमतेचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफार्मर बसवून अखंड वीजपुरवठ्याची सोय केल्याचे सांगून नवीन भूखंड, उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न, भविष्यात औद्योगिक वसाहतीचा विस्तार व उद्योगधंद्यांमध्ये वाढ व इतर विकास योजनांबाबत त्यांनी उपस्थितांना अवगत केले. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नाने शासनाकडून सन २०१८-१९ मधील ग्रामविकास निधीतून ३६ लाख रुपये खर्चून नवीन सामाजिक सभागृह व सव्वादोन लाख रुपये खर्चून आर. ओ. वॉटर प्लांट उभारण्यात आला आहे. उद्योजकांसाठी हे सामाजिक सभागृह मोफत दिले जाणार असून, त्याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा. शासनाच्या योजनेतून पहिल्या टप्प्यात ड्रेनेजचा ४२ लाख ७९ हजार ४४५ रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असून, संस्थेस शासनाकडून ७५ टक्के निधी मिळून ३२.०९ लाखांचा मोठा फायदा झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात संस्थेचा १४ कोटी ५२ लाख १३ हजार ५०० रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असून, त्याची २५ टक्के रक्कम ३ कोटी ३६ लाख रुपये भरावयाची आहे. या १४ कोटीतून औद्योगिक वसाहतीत विविध कामे लवकरच होणार आहेत.

शिर्डी-कोपरगाव-येवला कॉरिडॉर विकसित करावा -विवेकभैय्या कोल्हे
समृद्धी महामार्ग कोपरगावच्या औद्योगिक वसाहतीच्या जवळून गेलेला आहे. सुरत-हैदराबाद महामार्गही आपल्या परिसरातून जात आहे. शिर्डी विमानतळ, रेल्वेस्थानक येथून जवळच आहे. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विदुतीकरण झालेले असून, दळणवळणाची व्यवस्था झाल्याने येथील उद्योजकांनी त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. शिर्डी भागात पर्यटन, कोपरगावला तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी)-येवला भागात वस्त्रोद्योग (टेक्स्टाईल) व्यवसायाला चालना देण्यासाठी शिर्डी-कोपरगाव-येवला असा कॉरिडॉर विकसित केला तर या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल. हा कॉरिडॉर विकसित करण्याची मागणी आपण शासनाकडे केली असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे कमी पाण्यावर चालणारे उद्योग या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत, असेही विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.
बिपीनदादा कोल्हे म्हणाले, भारत देश पुन्हा एकदा नवीन औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आगामी काळ उद्योजकांसाठी आव्हानात्मक व स्पर्धेचा काळ आहे हे लक्षात घेऊन कोपरगावातील उद्योजकांनी जागतिक स्थित्यंतराचा अभ्यास करून वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे, उद्योगवाढीसाठी काय करायचे याबाबत एकत्र येऊन खुली चर्चा केली पाहिजे. भारत देश माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. भारतात आयटी क्षेत्रात रोबोटिक्समध्ये जास्तीत जास्त काम होण्याची गरज आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या क्रमांकावर असून, देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ७.५ आहे. ‘मेक इन इंडिया’ साठी सध्या पोषक वातावरण आहे. स्थानिक उद्योजकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. पाणीटंचाई लक्षात घेता कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वॉटरलेस उद्योग सुरू झाले पाहिजेत.उद्योजक, कामगारांसह सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध -स्नेहलताताई कोल्हे
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीत नूतन सामाजिक सभागृह व आर. ओ. वॉटर प्लांट उभारणीसाठी शासनदरबारी विशेष प्रयत्न करून सन २०१८-१९ मधील ग्रामविकास निधीतून सामाजिक सभागृहासाठी ३६ लाख तर आर. ओ. वॉटर प्लांटसाठी सव्वादोन लाख रुपये निधी मंजूर करून दिला. या निधीतून ही दोन्ही कामे पूर्ण झाल्याचे समाधान आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये उद्योगवाढीसाठी तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला. बिपीनदादा कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातून रूरल शोर्स कॉल सेंटर सुरू करून या भागातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून दिला आहे. संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराने औद्योगिक सहकारी वसाहतीतील उद्योजक व कोपरगाव मतदारसंघातील जनतेसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना भेडसावणारा विजेचा, पाण्याचा प्रश्न व अन्य प्रश्न सोडविता आले याचे मला समाधान आहे. यापुढील काळातही उद्योजक, कामगारांसह सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

उद्योग-व्यवसाय करताना आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग केले पाहिजे. कारण, मार्केटिंग केले तरच अधिकाधिक लोकांपर्यंत आपण केलेले काम व उत्पादन पोहोचविता येते, उद्योग-व्यवसाय वाढवता येतो, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, महिला बचत गटात काम करत करत मी आमदार होऊन विधानसभेत गेले. आमदार झाल्यानंतर शासनाकडून कोट्यवधीचा निधी मिळवून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली. कोपरगावात नवीन बसस्थानक, नगरपालिका इमारत, पंचायत समिती इमारत, सार्वजनिक वाचनालय इमारत, नवीन अग्निशमन केंद्र, बाजार ओटे, वाढीव पाणीपुरवठा योजना, गोकुळनगरी पूल, शहर अंतर्गत रस्ते आदींसह बरीच विकासकामे केली; पण त्याचा कधीही गवगवा केला नाही. मात्र, त्याचे श्रेय दुसरेच लोक घेत आहेत, असा टोला स्नेहलताताई कोल्हे यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता लगावला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे