कोपरगावात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सोमवार १२ जून रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
कोपरगावात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सोमवार १२ जून रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
संपादक :- रविंद्र जगताप
नांदेड जिल्ह्यातील बोंढारमध्ये अक्षय भालेरावची हत्या होणे हे गंभीर आहे. या राज्यात दलित, वंचित समाज सुरक्षित नाही, अक्षय केवळ बोध्द आहे म्हणून आणि गावात भीम जयंती साजरी केली म्हणून ज्या पद्धतीने भोसकून त्याचा खून झाला, हे दुदैवी आहे. त्याच्या भावाला आणि आईला मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले -शाहू -आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या महाराष्ट्रात आज दलित सुरक्षित का नाहीत, असा प्रश्नही निर्माण होत आहे.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या तरुणाची गावातील गुंडांनी निर्घृण हत्या केली. त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. गावात आंबेडकर जयंती का साजरी केली, म्हणून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दोषींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मराठवाड्यातीलच लातूर जिल्ह्यात मातंग समाजाच्या व्यक्तीचा सावकाराने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. रेणापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. तीन हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतलेल्या गिरीधारी केशव तपघाले याने तीन हजार रुपयांपोटी २० हजार रुपये व्याज भरल्यानंतरही पैसे बाकी असल्याचे सांगत सावकाराने भर बाजारात गिरीधारीला मारहाण केली. त्यानंतर सावकाराने त्याचे घर गाठून तिथे त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून दंडुक्याने बेदम मारहाण केली. यात गिरीधारीचा मृत्यू झाला.बोध्द समाजाच्या इजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्या- युवतीचे बलात्कार करुन निघृण खून करण्यात आला.अशा घटनांच्या निषेधार्थ कोपरगावात 12 जून 2023 रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता नांदेड येथील अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणाहून निघून तहसील कचेरी तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यानंतर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी शहरासह तालुक्यातील भीमसैनिक माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव सकल आंबेडकर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.



