
मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांचा संकटकाळी बचत गट सखीला मदतीचा हात
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे दिनांक १३ मे २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी व भीषण वादळामुळे अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये धामोरी येथील सौ. सुनीता प्रकाश कांबळे यांच्या कुटुंबावरही मोठे संकट कोसळले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी संजीवनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कमळा महिला बचत गटाकडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेत गाय खरेदी केली होती. त्या गायीच्या माध्यमातूनच त्यांच्या कुटुंबाचा संसार सुरू होता.

मात्र, अतिवृष्टीदरम्यान त्यांच्या घराजवळील लिंबाचे झाड अचानक कोसळून गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आधीच हलाखीची परिस्थिती असलेल्या कांबळे कुटुंबासाठी हा मोठा आर्थिक व मानसिक धक्का होता. या घटनेची माहिती मिळताच मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी तातडीने धामोरी येथे धाव घेत सौ. सुनीता कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला व संकटाच्या काळात आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास दिला.

सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा आदर्श जपत मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते सौ. सुनीता कांबळे यांना नवीन गाय भेट देण्यात आली. बचत गटातील महिलांनी स्वबळावर उभे राहत केलेले कष्ट वाया जाऊ देणार नाहीत. संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली.यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव माळी, माजी संचालक अशोकराव भाकरे, कैलासराव माळी, बाजीराव विनोद मांजरे, विजयराव साळुंखे, प्रकाशराव वाघ, काकासाहेब वाघ, राहुल वाणी, सुनील वाणी, भाऊसाहेब भाकरे, वसंत गणपत माळी, राजेंद्र पगार, दौलत माळी, प्रदीप भुसे, नंदलाल माळी, दीपक माळी, गणेश माळी, नाझीम शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



