ज्ञानप्रसाराचे आद्य प्रवर्तक आचार्य बाळशास्त्री जांभेकर
ज्ञानप्रसाराचे आद्य प्रवर्तक आचार्य बाळशास्त्री जांभेकर
6 जानेवारी पत्रकार/ दर्पण दिन विशेष
आजच्या पत्रकारांनी समाजातील वास्तव्य बाहेर आणावे. गोरगरीब, दुर्बल ,दलित,पीडित शोषित यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. अज्ञानी व्यक्तींना कोणी गुलाम बनवू नये. भारतीय संविधानाने सर्वांना सारखे हक्क व अधिकार दिले आहेत हे पत्रकार बांधवांनी नेहमी लक्षात घ्यावे. स्वातंत्र्यापूर्वी असणारी पत्रकारिता ही निर्भिडपणाने चालत होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर,लोकमान्य टिळक यांची पत्रकारिता वाखण्याजोगी होती. यांचा विचार आजच्या पत्रकारांनी निश्चितपणे करावा.त्यांनी नीती मूल्याचा समतोल राखला पाहिजे. वृत्तपत्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आणि राजकारणावर प्रकाश टाकला जातो तो योग्य आहे की नाही याची जरूर पडताळणी करून पहावी .कारण त्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतात. म्हणून कसल्याही पद्धतीने त्याचे महत्त्व कमी होता कामा नये. त्या निमित्ताने हा केलेला शब्द प्रपंच* विचारांची दिशा देणारी पत्रकारिता आज थोडी सौम्य होत आहे असे मला वाटते. पूर्वीच्या काळात समाजात जागृती निर्माण करण्याचे काम वृत्तपत्रांनी केले. पत्रकाराने पत्रकारिता देशाच्या विकासासाठी केली पाहिजे. भ्रष्टाचार बाहेर काढून गुन्हेगारांना शासन केले पाहिजे .समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी करावे. तेव्हाच पत्रकारिता निर्भिडपणाने होईल .सत्य, विश्वास, आणि प्रामाणिकपणा या तीन गोष्टी आत्मसात केल्याशिवाय पत्रकारिता यशस्वी होणार नाही. पत्रकारिता ही नेहमी ध्येयवादी राहिली पाहिजे; ती विकावू असू नये. व्यक्ती किती मोठा असू द्या. तो कायद्यापुढे नतमस्तक झाला पाहिजे, नाही तर तो तुरुंगात गेलाच पाहिजे. म्हणून पत्रकाराच्या लेखणीत समाज परिवर्तन करण्याची ताकद असावी. अग्रलेख वाचून लाखो लोक त्या पद्धतीने विचार करतात म्हणून,संपादकांनी अग्रलेख वाचनीय लिहावेत. आपले राज्य का गेले?आणि इंग्रज भारतात का आले,? याचे अचूक निदान करणारे महाराष्ट्रातील पहिले विचारवंत,आद्य इतिहासकार, संशोधक, सर्वश्रेष्ठ पत्रकार, म्हणून आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते, ते एका ठिकाणी म्हणतात, शिक्षकांने शंभर पट ज्ञान आत्मसात केले तर दहा पट ते आपल्या विद्यार्थ्यांला देऊ शकतात,यातून वाचनाचे महत्त्व विशद करतात, आजच्या काळात वाचन कमी केले जात आहे, म्हणून आपल्याला इतर देशांच्या इतिहासाची माहिती नाही, त्यासाठी वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे,
ज्या वेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते, त्यावेळी आचार्य जांभेकरांनी स्त्री शिक्षण, पाश्चात्य शिक्षण, धर्म शिक्षण, इतिहास संशोधन, शिलालेख वाचन, ताम्रपट वाचन इत्यादीचे सखोल वाचन केल्यामुळे आज सर्वत्रच त्यांचे नाव आवर्जून घेतले जात आहे,
त्यांना दहा भाषा अवगत होत्या, बंगाली, तेलुगू, कानडी, फार्सी ,अरबी, गुजराथी, फ्रेंच, व ग्रीक त्यामुळेच ब्रिटिशांच्या काळातील ते विद्वान समजले जात होते,दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी होते, हिंदुस्थानातील पहिले प्रपाठक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला, 1832 साली आचार्य जांभेकरांनी *दर्पण* नावाचे पाक्षिक काढून समाजातील वाईट ,रुढी परंपरा काढून टाकण्याचा प्रयत्न केला, आणि दर्पण मधूनच समाजसुधारणा, स्वदेशाभिमान लोकांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केले,म्हणूनच, त्यांचा जन्म दिन 6 जानेवारी पत्रकार/दर्पण दिन म्हणून ओळखला जातो, वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्यास वर्तमानपत्र महत्त्वाची भूमिका पार पाडतात, समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल, व्यक्तीला सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे. तिचा उपयोग समाज बदलासाठी होऊ शकतो,असे ठामपणे आचार्य बाळशास्त्री जांभेकर म्हणतात, आज समाजामध्ये फूट पडत आहे, कोणी -कोणाचे ऐकून घेत नाहीत, मी मोठा आहे, माझा वंश मोठा आहे, म्हणून समाज दुभंगला जात आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी फक्त समाजाला उपदेश केला नाही, तर अनेक धर्मांतर केलेल्या लोकांना शुद्ध करून स्वधर्मात घेतले,चांगल्या समाजरचनेच्या उभारणी साठी न्याय व विवेक यांच्या आधारे समाज रचना उभी झाली पाहिजे,असे ते सतत म्हणत असत, आजही पत्रकारांनी समाजातील वास्तव्य बाहेर आणावे. गोरगरिबांना त्रास होणार नाही,गुलाम म्हणून कोणत्याही व्यक्तीला वागणूक दिली जाणार नाही ,यांची दक्षता घ्यावी, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर होता कामा नये, लोकमान्य टिळकांसारखी निर्भिड पत्रकारिता असावी, तरच गुन्हेगारी वर अंकुश बसेल, व गुन्हेगाराला जबर शिक्षा होईल, नाही तर सर्वत्रच अंदाधुंदी माजेल, यात तिळमात्र शंका नाही,
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी
1) नीतिकथा 2) सारसंग्रह,3) भूगोलविद्या, 4) द हिस्ट्री ऑफ इंडिया 5) द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया इत्यादी ग्रंथाची निर्मिती करून ज्ञान भांडार सर्वांना उपलब्ध करून दिले,
आज आपण जांभेकरांनी केलेल्या लिखाणासारखे लेखन करू शकतो का? यांचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे,त्यांनी भारतीय शिलालेख, ताम्रपट यांची सविस्तर माहिती ‘राॅयल एशियाटिक सोसायटीच्या’ लोकांपर्यंत वाचण्या साठी उपलब्ध करून दिली होती, म्हणूनच मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स कार्नेक यांनी , 1840 मध्ये ‘जस्टीस ऑफ दि पीस’ पदवी देऊन यथोचित त्यांचा गौरव केला, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, व ज्ञानेश्वरीचा पहिला छापील ग्रंथ पाठभेदासह त्यांनी संपादित केले,म्हणूनच त्यांना ज्ञानप्रसाराचे आद्य प्रवर्तक म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्या कडे पाहतो, आज आपण सर्वांनीच त्यांच्या सारखे निर्भिड वागलो, अनेक ग्रंथ लिहिले, अनेक भाषा शिकल्या, तरच आपला देश महासत्ता होण्यासाठी काही वेळ लागणार नाही, लोकांचे आकलन क्षमता वाढविण्याचे महान कार्य त्यांनी केले. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा ही त्यांची तळमळ होती त्यांचे विचार प्रगमन शील होते म्हणूनच त्यांना ज्ञानप्रसाराचे आद्य प्रवर्तक असे म्हणतातआजच्या पत्रकारांनी कोणत्याही व्यसना कडे वळू नये, परिश्रम करून चांगले जीवन जगावे, अंधश्रद्धेचे व अज्ञानाचे कीटाळ दूर करावे, एखादा व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्यांनी केलेल्या चुका समाजासमोर प्रकट कराव्यात आणि छोट्या व्यक्तीचे कर्तृत्व सर्वांसमोर दाखवून त्यांचे आत्मभान जागृत करावे ,आपली वाणी सडेतोड असावी, वाचावीर न होता कृतीवीर व्हावे , जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.. सर्व संपादक, पत्रकार, वार्ताहर बंधूना दर्पण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड



