ग्रामीण विकास केंद्र, जामखेडतर्फे लोककलावंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

ग्रामीण विकास केंद्र, जामखेडतर्फे लोककलावंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
लोकनाट्य कला केंद्रातील कलाकार महिलांचा सन्मान
(अरुण खरात ): ग्रामीण विकास केंद्र, जामखेड यांच्या वतीने लोककलावंत महिलांसाठी दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. पारंपरिक कला, लोकसंस्कृती आणि महिलांचे सशक्तीकरण यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम लोककलावंत महिलांसाठी सन्मानाचा आणि आत्मसन्मान जागवणारा ठरला.

या कार्यक्रमास लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध लोकनाट्य कला केंद्रांतील मान्यवर महिला कलाकारांची प्रमुख उपस्थिती लाभली. जय अंबिका कला केंद्राच्या अलकाताई जाधव, जगदंबा कला केंद्राच्या भामाबाई जाधव, झंकार कला केंद्राच्या लताताई जाधव, सप्तसूर कला केंद्राच्या मंदा अक्का चंदन, स्वरराज लोकनाट्य प्रशिक्षण केंद्राच्या राजश्री जाधव, घुंगरू लोकनाट्य प्रशिक्षण केंद्राच्या संजीवनी जाधव, रेणुका लोकनाट्य प्रशिक्षण केंद्राच्या ज्योती पवार तसेच नटराज लोकनाट्य प्रशिक्षण केंद्राच्या मंगलताई जाधव यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती.

हळदी-कुंकू कार्यक्रमादरम्यान पारंपरिक वेशभूषा, ढोलकी-घुंगरूंच्या निनादात सादर झालेली लोकनृत्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणातून लोककलेचा समृद्ध वारसा जपण्यात आला. लोककलावंत महिलांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. एकमेकांशी संवाद साधत त्यांनी सामाजिक एकात्मता, आपुलकी आणि आत्मीयतेचा संदेश दिला. या प्रसंगी ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की“हळदी-कुंकू हा सण केवळ सुवासिनी किंवा विवाहित महिलांपुरताच मर्यादित न राहता, विधवा, परित्यक्ता तसेच लोकनाट्य व कला केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या एकल महिलांनाही समाजात सन्मानाने स्थान मिळाले पाहिजे. त्यांनाही हळदी-कुंकूचा मान मिळावा, समाजाने त्यांचा सन्मान करावा, या उद्देशानेच हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”हळदी-कुंकू कार्यक्रमादरम्यान कलाकार महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक महिलांनी सांगितले की, हळदी-कुंकूचा असा कार्यक्रम त्यांच्या आयुष्यात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. संक्रांतीच्या वाणासह मिळालेला हळदी-कुंकू हा केवळ सणाचा भाग नसून, समाजाकडून मिळालेला सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हे सांगताना काही महिला भावनीक झाल्या.या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अरुण जाधव संस्थेच्या सचिव उमाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहसमन्वयक रेश्मा बागवान, पूजा जाधव, ऋषिकेश गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चंदन आणि संदीप आखाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.लोककलावंत महिलांना सन्मानाचे व्यासपीठ मिळावे, त्यांना एकत्र येण्याची आणि आपले अनुभव मांडण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सहभागी महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थित महिलांनी ग्रामीण विकास केंद्राच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.



