शांतता समितीच्या मिटिंग का होत नाहीत?:- विजय वहाडणे
शांतता समितीच्या मिटिंग का होत नाहीत?:- विजय वहाडणे
कोपरगाव शहरात कायमस्वरूपी शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी नियमितपणे शांतता समितीच्या मिटिंग होणे अत्यंत गरजेचे असूनही तसे होत नाही हे दुर्दैवच आहे. जयंती, पुण्यतिथी, धार्मिक कार्यक्रम यासाठी वेळोवेळी शहरातील सर्वपक्षीय-सर्वधार्मिय नेते-कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांचेसह मीटिंग न घेता वेळोवेळी काही जातीच्या किंवा धर्माच्या ठराविक नेते व कार्यकर्त्यांना बोलावून मिटिंगचा उपचार पार पाडला जातो. सर्वांनाच एकत्रित बोलावून सर्वसमावेशक मीटिंग होत नसल्याने एकमेकांबद्दलचे गैरसमज- म्हणणे-वाद मांडलेच जात नाहीत. त्यामुळे अनेक विषयावर असलेले वाद-संघर्ष आतल्या आत घुमसत रहातात व एखाद्या दिवशी, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम-उत्सवात त्या असंतोषचा स्फ़ोट होतो हे कोपरगावकरांनी अनेकदा अनुभवले आहे.काही वेळा तर कुणाशीही विचारविनिमय-चर्चा न करता कोपरगाव बंदही पुकारतात. हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल होतात.

सर्वात जास्त नुकसान लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे- दुकानदारांचेच होते. त्यामुळेच शहरात अनेक अपप्रवृत्ती बळावतात व शहरात गुन्हेगारी वाढून शांतता सुव्यवस्था धोक्यात येते. याच वातावरणाचा फायदा घेऊन अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्तेबाजी करणारेही समाजसेवक म्हणून मिरवितात हेही कटूसत्य आहे.

पोलीस प्रशासन, मे. तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन शांतता कमिटीच्या मिटिंग वरचेवर घेतल्या पाहिजेत. शहरातील स्वच्छ प्रतिमेचे समाजसेवक, कार्यकर्ते, व्यापारी प्रतिनिधी, राजकीय नेते-कार्यकर्ते, संघटना यांना बोलावून विचारविनिमय केला पाहिजे. अन्यथा आधीच शिगेला पोहचलेली गुन्हेगारी- समाजकंटकांची मुजोरी वाढतच जाणार आहे.पोलीस प्रशासनाचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. तडीपार-अवैध धंदे करणारे यांची पोलीस स्टेशनमधील उठबस सर्वसामान्य नागरिकांसाठी, शहरासाठी घातक आहे. राजकीय हस्तक्षेपाला अधिकाऱ्यांनी बळी पडू नये.दंडूक्याचा वापर करा हे मी अधिकाऱ्यांना नेहमीच सांगत असतो. पण ते कोणत्या दबावाखाली आहेत हेही कळत नाही. आता तर भर वस्तीत दरोडे पडू लागलेत. आता तरी प्रशासनाने कठोर भूमिका घेतलीच पाहिजे.
