जागतिक महिलादिनी कोपरगांवात बचत गटाच्या माध्यमातून एक कोटीचे कर्ज वितरण -स्नेहलता कोल्हे.
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत विविध बँका व बचतगटाच्या माध्यमांतून कोपरगांव विधानसभा मतदार संघातील ५८ महिला बचतगटांना सुमारे १ कोटी रूपयांचे कर्जवाटप भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोपरगाव :- महिला कार्यकतृत्वाच्या नांवलौकीकात कोपरगांवचे नांव राज्यात अव्वल असुन जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत विविध बँका व बचतगटाच्या माध्यमांतुन ५८ महिला बचतगटांना सुमारे १ कोटी रूपयांचे कर्जवाटप भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी कोपरगांव येथे करण्यांत आले. स्त्री शिक्षण महत्वाचे असुन महिला या आत्मसन्मानाचे केंद्र आहे. त्या प्रत्येक क्षेत्रात भरारी घेवुन आकाशाला गवसणी घालण्याचे काम करत आहेत असेही त्या म्हणाल्या.संजीवनी, कोपरगांव तालुका स्वयंसहाययता महिला बचतगटसंस्थेच्यावतीने जागतिक महिलादिनानिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी हे कर्ज वितरण करण्यात आले. प्रारंभी राजमाता जिजाउ, सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. अनिता मुरकुटे यांनी प्रास्तविक केले. शिल्पा रोहमारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अस्मिता पवार, मनिषा औताडे, निलीमा औताडे, मंगल पवार या महिलांनी आपले अनुभव सांगितले.
पिठाला कष्टाच्या मीठाची जोड
बचतगट ही महिलांची आत्मशक्ती आहे. संसारप्रपंचाचा गाडा ओढतांना पिठाला कष्टाच्या मीठाची जोड या भगिनी देत आहेत, त्यांचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे असे सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोपरगांव विधानसभा मतदार संघात १५ ते १७ वर्षापुर्वी लावलेल्या छोटयाशा रोपटयाचा आज वटवृक्ष झाला आहे. येथील महिला भगिनींचे संघटन करून त्यांना बचतगटाच्या व्यवहाराची माहिती देत निरक्षरांना साक्षर करून तिला बँकेच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यातुन तिने पोटाला चिमटा घेत उभ्या केलेल्या बचतीतुन स्वतःच्या संसारप्रपंचासाठी मोठा हातभार लावला आहे, आज येथील कित्येक महिलाबचतगट स्वतःच्या पायावर उभ्या राहुन वेगवेगळे रोजगार, स्वयंरोजगार करत आहेत. व्यवसायातुन आत्मनिर्भर होत ती स्वतःच मार्गक्रमण करत आहे. एक कोटी रूपयांचे कर्जवितरण ही सहजशक्य गोष्ट नाही तर त्यासाठी महिलांचे अतोनात कष्ट आहेत. उन्नत समाज घडविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाला महत्व दिले म्हणून आज महिला कुठल्याही क्षेत्रात प्रभावीपणे काम करतांना दिसत आहे. स्त्री शिक्षण हा कुटूंबाच्या आर्थीक उन्नतीचा पाया आहे. बचतगटापासून सुरू केलेला प्रवास थेट विधीमंडळापर्यंत जाऊन पोहोचला याचे मला आत्मीक समाधान आहे. सतत समाजकारणातुन प्रगतीचा मार्ग शोधायचा आणि अडचणी सोडवत महिलेसह सर्वांना बरोबर घेवुन पुढे जायचे ही शिकवण माजीमंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली म्हणून बचतगटाची मोठी चळवळ कोपरगांव विधानसभा मतदार संघात उभी करू शकले असे त्या म्हणाल्या. शेवटी सुरेखा आवारे यांनी आभार मानले. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, दिपक चौधरी, जगदिश मोरे, सुशांत खैरे यांच्यासह सर्व भाजपा पदाधिका-यांनी सौ स्नेहलता कोल्हे यांचा महिलादिनाचे औचित्य साधत सत्कार केला.


