
संजीवनी युवा प्रतिष्ठानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; गुलाब पुष्प देत इंधन बचतीचा सन्मान
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे इंधन बचत व पर्यावरण जनजागृती अभियान उत्साहात संपन्न
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक २३ मे २०२६ रोजी कोपरगाव शहरात इंधन बचत,पर्यावरण संरक्षण आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा विशेष जनजागृती उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा संदेश सर्व देशवासीयांना देत पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करून ई-बाईक, सायकल आणि पर्यायी ऊर्जेच्या साधनांचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.अभियानादरम्यान भारत माता की जय!,वंदे मातरम्! इंधन बचाओ देश बचाओ! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. युवकांनी घेतलेला हा सामाजिक आणि राष्ट्रहिताचा पुढाकार नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून देशहिताचा सकारात्मक संदेश देणारा ठरला.

राष्ट्र प्रथम हीच भावना अंगीकारून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरात ई-बाईक व सायकलचा वापर करणाऱ्या नागरिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या तसेच देश विकासामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देत त्यांचा गौरव करण्यात आला.या अभियानातून युवकांनी समाजामध्ये पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि स्वदेशीचा स्वीकार याबाबत प्रभावी जनजागृती केली.देशसेवा ही केवळ शब्दांत नसून ती कृतीतून दिसली पाहिजे,हा संदेश अभियानातून देण्यात आला. युवकांनी हातात जनजागृतीपर फलक घेत राष्ट्र प्रथम हीच माझी जबाबदारी!,ई-बाईक वापरा इंधन बचत करा!,पेट्रोल-डिझेल बचत हीच खरी देशसेवा! तसेच स्वदेशी स्वीकारा समर्थ भारत घडवा!अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.


