कोपरगावात संतापाचा उद्रेक! धार्मिक भावनांशी खेळणाऱ्या ‘तंबाखू’ कंपन्यांविरोधात रणशिंग; १६ जुलैपासून तहसीलवर तीव्र धरणे आंदोलन सुरू, २३ जुलैपासून थेट ‘आमरण उपोषण’!’

कोपरगावात संतापाचा उद्रेक! धार्मिक भावनांशी खेळणाऱ्या ‘तंबाखू’ कंपन्यांविरोधात रणशिंग; १६ जुलैपासून तहसीलवर तीव्र धरणे आंदोलन सुरू, २३ जुलैपासून थेट ‘आमरण उपोषण’!’
माझे गाव माझा अभिमान’ अभियानाचा कडक इशारा; ‘ओम’, ‘पंढरपूर’ आणि ‘गाय’ छापचे चित्र न हटवल्यास प्रशासनाला खिंडीत गाठणार
कोपरगाव:व्यावसायिक फायद्यासाठी हिंदूंच्या धार्मिक श्रद्धास्थानांचा आणि गोमातेचा तंबाखूच्या पाकिटांवर वापर करून करोडो जनतेच्या भावना तुडवणाऱ्या कंपन्यांविरोधात कोपरगावात संतापाचा तीव्र उद्रेक झाला आहे. ‘माझे गाव माझा अभिमान’ अभियानांतर्गत कोपरगावकरांनी दिनांक १६ जुलै २०२६ पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने जर १७ जुलै २०२६ च्या अंतिम मुदतीपर्यंत संबंधित कंपन्यांवर कायदेशीर बडगा उचलून ते आक्षेपार्ह नाव आणि चित्र हटवले नाही, तर २३ जुलै २०२६ पासून याच ठिकाणी ‘आरपारची लढाई’ म्हणून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा कडक इशारा आंदोलकांनी दिला आहे.पंढरपुरी तंबाखूच्या पाकिटांवरून अत्यंत पवित्र असे ‘ओम’ हे नाव आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचे नाव, तसेच ‘गाय छाप’ तंबाखूवरून गोमातेचे चित्र आणि नाव तात्काळ हद्दपार करावे, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (अहिल्यानगर), अन्न व औषध प्रशासन, ट्रेडमार्क रजिस्ट्री (मुंबई) आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना थेट निवेदने पाठवून प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे.१६ जुलैपासून धरणे आंदोलनाला बसलेल्या नागरिकांनी प्रशासकीय सुस्तपणावर कडाडून टीका केली आहे. “आमच्या श्रद्धा आणि गोमातेचा अवमान आम्ही अजिबात सहन करणार नाही,” असा संतप्त पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. हे सुरू असलेले धरणे आंदोलन केवळ एक सुरुवात असून, प्रशासनाने दिलेला अल्टिमेटम हलक्यात घेतल्यास २३ जुलैपासून होणाऱ्या आमरण उपोषणाची धग संपूर्ण जिल्ह्याला सोसावी लागेल, असा थेट इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा आंदोलकांच्या जिवाला बरे-वाईट झाल्यास, उसकी सर्वस्वी आणि अंतिम जबाबदारी प्रशासनाची आणि सरकारचीच राहील, असा सज्जड दम आंदोलक विनय भगत, मयूर आव्हाड आणि विजय जाधव अमित आढाव यांनी प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनाला आता कोपरगाव आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात जनपाठिंबा मिळत असून, वातावरण कमालीचे तापले आहे.





