महाराष्ट्र

जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अवजड वाहतुकीबाबत अरुण खरात यांची हरकत….

जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अवजड वाहतुकीबाबत अरुण खरात यांची हरकत….

अहमदनगर मनमाड या महामार्गाचे दुरुस्तीच्या कामामुळे दिनांक 15 ऑक्टोबर पासून मनमाड ,येवला, शिर्डी कडून अहमदनगर मार्गे पुणे ,मुंबई ,कल्याण कडे जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा फाटा येथून चांदेकसारे, संगमनेर ,आळेफाटा मार्गे वळवण्यात येणार आहे. ती वाहतूक किती दिवसांसाठी असणार आहे हे निश्चित केलेले नाही परंतु ह्या वाहतुकीमुळे चांदेकसारे परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढेल अशी भिती चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी व्यक्त केली आहे.या वळवण्यात येणाऱ्या वाहतुकीबाबत नागरिकांच्या काही हरकती असतील तर समक्ष भेटून किंवा ईमेल द्वारे हरकत नोंदवण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुखांनी केले होते त्या संदर्भात अरुण खरात यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे ई-मेल द्वारे आपली हरकत नोंदवली आहे.हरकती मध्ये ते म्हणतात की, हा रस्ता एवढी मोठी अवजड वाहतूक सहन करेल का ही शंका आहे. चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे झगडे फाटा चांदेकसारे येथे समृद्धीचे काम करणाऱ्या राज कंट्रक्शनचे तसेच चांदेकसारे येथे गायत्री कंपनीचे मुख्य कार्यालय आहे . सध्या शिर्डी सिन्नर ह्या रस्त्याचे ही काम चालू आहे. झगडे फाटा येथे या रस्त्याचे काम करणाऱ्या कार्लोमान्टो कंपनीच्या गाड्यांची खूपच वर्दळ असते त्यामुळे या परिसरात अवजड वाहनांचे प्रमाण पहिलेच वाढलेले आहे. झगडे फाटा येथे उड्डाण पुलाचे काम चालू आहे तेथे सतत मोठमोठ्या क्रेन, गाड्या रस्त्यावरतीच उभे असतात तेथे सतत कामगारांची वर्दळ असते तेथे चौफुली असल्याने वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. चांदेकसारे झगडे फाटा रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या मोठ्या पुलाचे काम चालू आहे त्यामुळे तेथे जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत पर्यायी कच्चा रस्ता तयार करून वाहतूक वळवलेली आहे तेथे अजून अवजड वाहतूक वाढल्यास रस्ता खचून अपघाताचे प्रमाण वाढेल. समृद्धी महामार्गासाठी लागणारे गल्डरचे मोठे कारखाने चांदेकसारे येथे एक व झगडे फाटा येथे एक असे दोन कारखाने आहेत तसेच गोदावरी नदीतून उपसलेल्या समृद्धीसाठी लागणाऱ्या मातीची वाहतूक करणारे डंपर याच रस्त्यावरून रात्रंदिवस धावत असतात. त्यामुळे त्यांचेही वाहनांची वर्दळ या रस्त्यावरती असते. या सर्व वाहतुकीमुळे रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांचे धुळीचे साम्राज्य वाढल्यामुळे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. लवकरच सर्वात मोठा असलेला दिवाळी सण येतोय त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील गाव खेड्यातील लोक कोपरगाव शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी याच रस्त्यावरून येतील तीही वर्दळ वाढणार आहे आणि ऐन सणासुदीच्याच काळात या रस्त्यावरून वाहतूक वळवण्याचा निर्णय झालेला आहे.
सध्याच या रस्त्यावर असणारी मुख्य वाहतूक , समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनांची वाहतूक , शिर्डी सिन्नर रस्त्याच्या कामाच्या वाहनांची वाहतूक आणि आता या मार्गे वळवण्यात येणाऱ्या अवजड वाहनांची भर त्यामुळे चांदेकसारे झगडे फाटा या रस्त्यावर निश्चितच अपघाताचे प्रमाण वाढून वाहतूक कोंडीमुळे व धुळीच्या साम्राज्यामुळे येथील रहिवाशी व प्रवाशांचे आरोग्य व जीव धोक्यात येणार आहे.एकीकडे सरकार सांगते की इंधन वाचवा – देश वाचवा परंतु येथे वाहतूक वळवल्यामुळे वाहनांचा प्रवास वाढणार आहे व इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होणार आहे.तेव्हा वरील सर्व बाबींचा विचार करून अवजड वाहतूक चांदेकसारे मार्गे न वळवता दुसऱ्या एखाद्या पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी अशी नम्र विनंती जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी केली आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे