थॅलेसेमियाग्रस्तांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी कोपरगावात रक्तदान शिबीर
थॅलेसेमियाग्रस्तांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी कोपरगावात रक्तदान शिबीर
कोपरगाव : ‘जागवू या ज्योत माणुसकीची’ या ब्रीदवाक्यानुसार विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून महाराष्ट्रात सर्वदूर आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त येत्या ९ मे (मंगळवार) रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोपरगाव व पंचक्रोशीतील थॅलेसेमिया आजाराने पीडित मुलांची रक्ताची गरज भागविण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोपरगाव येथील व्यापारी धर्मशाळेत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे.
थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित व प्रामुख्याने बालकांमध्ये आढळणारा अनुवांशिक आजार आहे. जो मोठ्या माणसांपासून लहान मुलांमध्ये पसरतो. यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन व लाल रक्तपेशींची संख्या वेगाने कमी होते. आपल्या देशात दरवर्षी हजारो मुलांना थॅलेसेमिया हा आजार होतो. थॅलेसेमिया या आजारात लाल रक्त पेशी जिवंत राहण्याची क्षमता कमी होऊन १० ते २५ दिवसांची होते. थॅलेसिमियाबाधित रुग्णांमध्ये शरीरात रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्यांना ठराविक दिवसांनी रक्त संक्रमण करावे लागते. रक्तपेढ्यांमधून या रुग्णांना रक्त मोफत मिळत असले तरीही रक्त संक्रमणासाठी दर महिन्याला खर्च करावा लागतो. वेळेवर रक्त मिळाले नाही तर अनेकांचा मृत्यूदेखील होतो. कोपरगाव शहर व परिसरात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या बरीच आहे. रक्त मिळविण्यासाठी त्यांची खूप ओढाताण होते. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून कोपरगाव येथे व्यापारी धर्मशाळेत ९ मे (मंगळवार) रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक एकता, आरोग्य या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक भान जपत नि:स्वार्थीपणे समाजकार्य करत आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात संकटग्रस्तांना मदत, सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, मोफत श्रवण यंत्रे व चष्मे वाटप, २४ तास ॲम्ब्युलन्स सुविधा, करिअर मार्गदर्शन, महापुरुषांची जयंती, दहीहंडी उत्सव, ग्राम स्वच्छता, पर्यावरण संतुलन, श्रमदान, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात. संजीवनी युवा प्रतिष्ठानने तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात स्वखर्चाने कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी मोफत औषधोपचार, ऑक्सिजन सिलिंडर व भोजनाची सोय करून त्यांना जीवदान दिले. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त १२ जानेवारी २०२३ रोजी कलश लॉन्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा ९ मे २०२३ रोजी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी. शिबिरात सहभागी होण्यासाठी मो. ८१८१९०९०९० वर संपर्क साधावा, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे तसेच सर्व युवा सेवकांनी केले आहे.



