ब्रेकिंग

उपासनेतील चंद्रावर ‘इस्रो’ यानाचा नवा अध्याय…

चंद्रयान ३ निमित्ताने सुशांत घोडके यांचा लेख…

शंकराच्या मस्तकावरील जटेवर अर्धचंद्र असतो,या चंद्राला शंकर देवाचे मुकुट शिव उपासकात म्हटलं जाते…भगवान गौतम बुद्धाला बोधी (पिंपळ) वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली, तो दिवस पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख उजेडाचा होता…बौध्दांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे…ईस्लामी कालगणना चंद्राची गती आणि स्थितीवर अनुसरून आहे.रमजान,बकरी ईद, हज यात्रा चंद्राच्या विविध अवस्थांवर अवलंबून असतात.चंद्रोदयापासून इस्लामी महिणासुरु होतो. रमजानचा उपवास चंद्रदर्शनानंतर सोडला जातो…भगवान महावीरांनी ‘सूर्य’ आणि ‘चंद्र ही देवाचा वास असलेली ठिकाणं सांगितली आहे…जैनांमध्ये ‘सूर्य’ आणि ‘चंद्र’ यांना देव मानतात…शिख समुदायात चंद्र पौर्णिमेच्या दिवशी गुरुद्वारात विशेष प्रार्थनेचे आयोजन केले जाते…श्री गणेश चतुर्थी उपवासाची सोडत हिंदू पंचांगानुसार चंद्रोदयाने होते…कोजागिरी पौर्णिमेच्या मध्य रात्री चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून रात्र जागवली जाते…कोजागिरीच्या रात्री रायगडावरुन याच चंद्राच्या लख्ख उजेडात हिरकणी कोकणकडा उतरुन रायगडवाडीत पोहचण्याचे धाडस केले होते…समुद्राला भरती येवून मत्स्यव्यवसाय करणारे नारळी पौर्णिमा चंद्राचे दर्शन घेऊन साजरी करतात…बाल गोपाळांना चांदोबाच्या गोष्टी आवडीच्या वाटतात…आपल्याही लहानपणी ‘चांदोबा’ मित्र वाटायचा, त्याच्या नावाची अनेक बडबड गीतही ऐकवली जातात…स्वातंत्रसैनिक मादाम कामा यांनी परदेशात पहिल्यांदा भारताचा राष्ट्रध्वज फडकविला त्यावर ‘सूर्य आणि चंद्र’ यांचे प्रतिक होते…पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने पृथ्वी प्रकाशमान होते त्यामुळे अनेक ठिकाणी वीज वितरण या दिवशी स्ट्रीट लाईट बंद ठेवण्यात येते…’चंद्र’ उपग्रहासंदर्भात हे एवढे सगळे भारत वर्ष परंपरेतील संदर्भ आत्ताच देण्याचे कारण म्हणजे भारतानं १४ जुलै रोजी श्रीहरी कोटा येथून झेपावलेले ‘चंद्रयान ३’ हे २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ०४ मिनीटांनी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे…

अगणित वर्षाचा अंतराळातील पृथ्वीचा उपग्रह “चंद्र” आजही पहावयास मिळतो. हा लेख आपण वाचत असाल तेव्हा भारताचे “चंद्रयान ३” मोहिमेचे सुवर्ण पान उलगडून भारत राष्ट्राची मान विश्वात उंचावलेली असेल.पृथ्वी पासून सुमारे ३८४,४००कि.मी.अंतरावर “चंद्र” हा पृथ्वीचा उपग्रह आहे.इस्त्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं ‘चांद्रयान ३’ ही मोहीम हाती घेतली आहे. ‘चांद्रयान ३’ सध्या चंद्रापासून २५ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरण्यासाठी ‘डीबूस्टिंग’ची (वेग कमी करण्याची) प्रक्रिया यशस्वीपणे झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) जाहीर करण्यात आले आहे.‘चांद्रयान ३’ चंद्राच्या कक्षेमध्ये असून, प्रॉपल्शन आणि लँडर मॉड्यूल १७ ऑगस्ट रोजी विलग झाले होते. ‘चांद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले असून ते २५ किमी अंतरावर आहे.चांद्रयानाचं चंद्रावर लँडिंग २३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रावर होणार आहे, अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे. हे लँडिंग इस्त्रोच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.अंतराळातील नवग्रहांचे नायक बृहस्पतींना संबोधले जाते. त्यांचे पौराणिक कालखंडात ज्योतिषशास्त्र, पंचांग हे अंतराळातील सूर्य, चंद्र आणि ग्रहांचे बदलत रचनेनुसार प्रचलित आहे.घरोघरी दिसणारे दाते पंचांग हे ज्योतिषशास्त्र नुसार ग्रहांची दैनंदिन बदल माणुष्याच्या राशी बदल दर्शवितात.समुद्राचे भरतीवेळी चंद्र लखलखीत प्रकाशित झालेला पहावयास मिळतो.चंद्राला स्वत:चा प्रकाश नसतो.त्याच्या पृष्ठभागावर सूर्याचा प्रकाश पडला की त्याचा काही भाग परावर्तित होतो. त्यामुळे चंद्र आपल्याला प्रकाशमान दिसतो.चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अमेरिकन अंतराळयात्री आर्मस्ट्रॉंग हे आपणास ज्ञात असेलच.भारताची पहिली मिसाईल तयार करणारे अंतराळ संशोधक विक्रम साराभाई तसेच माजी प्रधानमंत्री राजीव गांधीं यांनी विज्ञानाच्या दृष्टीने भारताचे एक पाऊल पुढे ठेवले.पुढे जावून मिसाईल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे रुपाने भारताला राष्ट्रपती मिळाला. लालबहादूर शास्री यांच्या “जय जवान, जय किसन” नारा दिला. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी “जय विज्ञान” असा जोडनारा देऊन विज्ञान तंत्रज्ञानाचे पाऊल पुढे टाकले…इस्रोच्या माध्यमातून “चंद्रयान ३” मोहीम यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे.करदात्यांच्या पैशातून भारताने आयोजित केलेली “चंद्रयान ३” या मोहिमेला जगभरातून पाठबळ मिळत आहे. या मोहिमेला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व भारतीयांच्या अहोरात्र झटलेले शास्त्रज्ञांना नभांगणातील ता-यांप्रमाणे असंख्य शुभेच्छा या निमित्ताने आहेत.

अंतराळावर संशोधन करणा-या “इस्रो” या संस्थेचे महत्त्व आज भारताच्या ग्रामीण भागातील अंतराळात संशोधन वृत्ती जोपासण-या सरकारी शाळांमध्ये रुजते आहे. काही वर्षापूर्वी शालिनीताई विखे अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची खगोलशास्त्राची स्पर्धा सलग दोन वर्षे राबविण्यात आली.यातून प्रत्येक तालुक्यातून दर वर्षी तीन विद्यार्थी निवडले.हे विद्यार्थी आंध्र प्रदेशातील बंगालच्या उपसागरातील बेटावर श्रीहरी कोटा स्थित “इस्रो” येथे सात दिवसाचा अभ्यास दौरा करून आले.गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांचे समवेत कोपरगांव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील ६ विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. आत्मा मालिक, संजीवनी या सह विविध संस्थाचे विद्यार्थी येथे स्वतंत्र जावून आले आहे.”चंद्रयान ३” हे यान चंद्रावर यशस्वी उतरुन चंद्राचे विविध अंगांनी होणारे संशोधन या खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत पोहचविणे ही विज्ञानवादी भारताची गरज असणार आहे.इस्रो द्वारे ‘चंद्रयान-३’ पाठवण्यासाठी एलव्हीएम-३ लाँचरचा वापर करण्यात आला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनेल.तारुण्याच्या उंबरठ्यावर नवोदित पिढीतील चंद्रावरील संशोधनास चंद्रयान ३ मोहीम फलदायी ठरणार आहे. चंद्रयान ३ मुळे भारत राष्ट्रातील विविध समुदायातील धार्मिक अस्मितेच्या बिंदूंपैकी एक “चंद्र” हा उपग्रह अतिशय जवळून यापुढे पहावयास आणि अभ्यासास मिळणार आहे.

 

शेकडो वर्षापुर्वी गावा-गावात ठराविक देवा व्यतिरिक्त इतर देवांच्या व्यक्तिरेखांविषयी जनता अनभिज्ञ होती. राजा रविवर्मा चित्रकाराने कला प्रतिभेने साकारलेली वेगवेगळ्या देव देवतांची चित्रे जनसामान्यांच्या घराघरात चित्र रुपाने घेऊन गेली. भारतीयांमध्ये श्रद्धाळूपणा फार आहे. एरवी ढगांमध्ये आपापल्या ईश्वराचे प्रतिबिंब शोधणा-या भोळ्या-भाबड्या जनतेला याच चंद्रयानाचे टिपलेले एखादे छायाचित्र त्यांचे ईश्वरासारखे भासले तर ते चित्र घरोघरी दिसू लागतील.असो|…चंद्रावरील जीवसृष्टीचे संशोधन आणि भारतीय मनुष्याचे पाऊल यासाठी चंद्रयान ३ महत्त्वाचे आहे.

एखाद्याने कर्तुत्व गाजविले तर “जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत तुमची किर्ती राहो !”. असे गौरव उद्गार आपण सहजपणे उद्गारतो…या वरुन चंद्रांचे दीर्घायुष्य अधोरेखित होते.”चंद्र” म्हणजे शितलता.”चंद्र” म्हणजे व्यक्तीच्या मनातील चांगले विचार, सृष्टीच्या कल्याणासाठी पुढे चालत रहावं असं हा “चंद्र” दर्शवतो.आपण सगळ्यांनीच चंद्रयानाचे निमित्ताने बोध घेवून अंगिकारायला काय हरकत आहे.

भारतीयांच्या उपासनेतील चंद्रावरील ‘इस्रो’ यानाचा हा नवा अध्याय “चंद्रयान ३” जल्लोषात साजरा करुया...

*जय जवान, जय किसान, जय विज्ञान*
*जय हिंद!*

– सुशांत घोडके
( लेखक हे भारत सरकारचे स्वच्छतादूत असून गोदातीर परिसर ईतिहास संशोधन मंडळाचे सदस्य आहेत.) मो. ९४२३१६६१०३

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे