ब्रेकिंग

कोळगाव थडी येथे महिलांचा ग्रा. पं. वर हंडा मोर्चा; पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा २ ऑक्टोबरपासून  उपोषण

कोळगाव थडी येथे महिलांचा ग्रा. पं. वर हंडा मोर्चा; पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा २ ऑक्टोबरपासून  उपोषण
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील ग्रामपंचायतच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ३० ऑगस्टपासून पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. पाणी चोरी बंद करून वाढीव वीजबिलामुळे जो आर्थिक भुर्दंड बसला आहे त्याची रक्कम विद्यमान सरपंच व ग्रा. पं. सदस्यांकडून वसूल करावी, गावात दररोज शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी मंगळवारी (५ सप्टेंबर) महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध केला. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास २ ऑक्टोबरला ग्रा. पं. समोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक पुंजाजी चिमाजी राऊत यांनी केले.
जाहिरात
जाहिरात
कोळपेवाडी येथील साखर कारखान्याशेजारी असलेल्या या गावात ग्रामपंचायतच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे कोळगाव थडी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोळगाव थडी गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून कोळगाव थडी गावासाठी ५९ लाख ५१ हजार रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करवून आणली. मार्च २०१८ मध्ये ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे गावचा पाणीप्रश्न सुटला व महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली. स्नेहलताताई कोल्हे यांनी पाणीपुरवठा योजना राबवून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम केले; पण विद्यमान सरपंच व ग्रा. पं. सदस्यांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे महिलांना पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. मात्र, ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावकऱ्यांना पुन्हा पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. गावात ३० ऑगस्टपासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (५ सप्टेंबर) ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुंजाजी चिमाजी राऊत, नानासाहेब पंडोरे, शामराव मेहेरखांब, बाजीराव निंबाळकर, भिकचंद लुटे, पोपट निंबाळकर, बाजीराव महाले, राजाराम चंदर निंबाळकर, बाबासाहेब बाबुराव निंबाळकर, भास्कर मेहेरखांब, बाबासाहेब संपतराव निंबाळकर, दिनकर जाधव, वाल्मीक जाधव, कुर्मदास जाधव, किसनराव राऊत, अप्पासाहेब जाधव, वसंतराव वाकचौरे, माधव लुटे, शिवाजीराव चव्हाण, रावसाहेब कवडे, अनिल अंबेकर, गोरख पंडोरे, अनिल लुटे, राहुल राऊत, अनंता वाकचौरे, दीपक वाकचौरे, दीपक घुगरे,  आकाश जाधव, बाबासाहेब गाडे, अलका निंबाळकर, पूनम अंबेकर, वत्सलाबाई राऊत, ज्योती जाधव, सुनंदा जाधव, शुभांगी राऊत, मीराबाई घाटकर, बेबीताई मेहेत्रे, अलका पंडोरे, सुमनबाई पंडोरे, अनिता कासार, चंद्रकला शहादे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक हजर नव्हते. उपसरपंच सुनील चव्हाण व ग्रा.पं. सदस्य दिनकर वाकचौरे यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, कोळगाव थडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या उदभवापासून मुख्य जलवाहिनीला बेकायदेशीर नळ कनेक्शन देण्यात आलेले असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याची सर्रास चोरी होत आहे. ही पाणी चोरी पूर्णत: बंद करावी. गावातील पाण्याची टाकी दोन तासात भरणे आवश्यक असताना या पाणी चोरीमुळे टाकी भरण्यास सात ते आठ तास लागतात. त्यामुळे अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतला वीजबिलाचा मोठा आर्थिक भुर्दंड बसतो आहे. पाणीपुरवठ्याचे दरमहा वीजबिल अंदाजे तीन हजार रुपये येते. मात्र, ७५ टक्के पाणी चोरीमुळे ग्रामपंचायतला वीजबिलाचा नाहक मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतला वीजबिलापोटी मासिक २२५० रुपयांप्रमाणे वार्षिक ३० हजार रुपये विनाकारण भरावे लागत आहेत. गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतला पाणी चोरीमुळे वाढीव वीजबिलापोटी दीड लाख रुपये भरावे लागले आहेत. दरमहा ३ हजार रुपयांप्रमाणे वीजबिलाची थकीत रक्कम आज एक ते दीड लाखांवर गेली आहे. सरपंच व ग्रा. पं. कमिटीने एवढी मोठी थकबाकी का होऊ दिली? ग्रामपंचायत वेळोवेळी वीजबिलाची रक्कम महावितरण कंपनीला भरते. ती रक्कम महावितरण कंपनी व्याजात जमा करते. वेळोवेळी वीजबिल मुदतीत न भरल्यामुळे ग्रामपंचायतने भरलेली रक्कम महावितरण कंपनीने व्याजात जमा केली आहे. सरपंच व कमिटीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामपंचायतला विनाकारण मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन पेपर मिलच्या रोडलगत आणावयाचे ठरले असताना काही विघ्नसंतोषी मंडळीमुळे कोळपेवाडी गावच्या पूर्वेकडे कोळगाव ते मढी रोडच्या कडेने आणल्यामुळे पाणी चोरी वाढली आहे. पाईपलाईनचा खर्चही अंदाजे ७ लाख रुपयांनी वाढला असून, यामध्ये सरकारचे विनाकारण मोठे नुकसान झाले आहे. संबंधित सरपंच व ग्रा. पं. सदस्यांच्या मनमानी व चुकीच्या नियोजनामुळे पाणीपुरवठा योजनेचे मोठे नुकसान ग्रामस्थांना सहन करावे लागत आहे. पाणी चोरी बंद करून वाढीव वीजबिलापोटी ग्रामपंचायतला भरावे लागलेली रक्कम विद्यमान सरपंच व ग्रा. पं. सदस्यांकडून वसूल करावी, गावात नियमित शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करावा अन्यथा महात्मा गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबरला ग्रा. पं. समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे