कोपरगाव तालुक्यातील सुरेगावात १५ हजार रूपयांचा गुटखा पकडला

कोपरगाव तालुक्यातील सुरेगावात १५ हजार रूपयांचा गुटखा पकडला
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव : बंदी असलेला गुटखा व सुंगधी तंबाखूची विक्री करणाऱ्या तालुक्यातील सुरेगाव येथील एका दुकानावर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच धाड टाकली. यावेळी १५ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. संबधीत दुकानदारास अटक करण्यात आली असून, त्यास माल पुरविणाऱ्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघे फरार आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गुटख्याची विक्री करणाऱ्या जय माताजी ट्रेडर्स या दुकानावर (दि.१२) जुलै रोजी दुपारी ४ वाजता छापा टाकला. यावेळी महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. यावेळी १४ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल दुकानाचे मालक अर्जुन महेंद्रकुमार सोनी (वय २५, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव) यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला.त्यांना अटक करण्यात आली असून सोनी यांना गुटख्याचा पुरवठा करणारे वसीम चोपदार (रा. कोपरगाव) व नितीन बोथरा (रा. विंचुर, जि. नाशिक) हे दोघे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी वरील तीन जणांविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल आण्णासाहेब तनपुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार जी.एस. वांढेकर करीत आहेत.