पतीने केले पत्नीवर चाकूने वार कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे घडली घटना

पतीने केले पत्नीवर चाकूने वार कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे घडली घटना
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव : तुमच्या सोबत नांदायला येणार नाही, म्हणताच पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वार केले. तालुक्यातील चासनळी येथे नुकतीच ही घटना घडली. पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जखमी संगिता सुभाष सोनवणे हीचे लग्न नांदगाव तालुक्यातील सोयेगाव येथील सुभाष हिरामण सोनवणे यांच्यासोबत झालेले आहे. परंतू संगिता सद्या चासनळी येथे मामा अण्णा वामण बर्डे यांच्या घरी राहाते. दि.११ जुलै रोजी सुभाष सोनवणे पत्नी संगिताला सोयेगाव येथे घेऊन जाण्यासाठी आला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास तो पत्नीला सासरी चल म्हणला, त्यावर तीने सासरी जाण्यास नकार दिला.तेव्हा रागाच्या भरात सुभाषने दमदाटी करून पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकूने वार केले. गळ्यावर वार केल्याने संगिता जखमी झाली. त्यानंतर सुभाषने स्वतःच्या गळ्यावरही वार करून घेतले. दोघांनाही जखमी अवस्थेत कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अण्णा वामण बर्डे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सुभाष सोनवणे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे. महाजन हे करीत आहेत.