कोपरगाव शहर रयत शैक्षणिक संकुलात स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
कोपरगाव शहर रयत शैक्षणिक संकुलात स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
कोपरगाव : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नामदार स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल कोपरगाव शहर रयत शैक्षणिक संकुलाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ड. संदीप वर्षे, जनरल बॉडी सदस्य श्री. अरुण चंद्रे, जनरल बॉडी सदस्य मा. श्री. पद्माकांत कुदळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. महेंद्रशेठ काले, आजीव सभासद श्री. शिवाजीराव लंके, आजीव सेवक सौ. सुनिता वाबळे, नगरसेवक बाळासाहेब रुईकर, मुख्याध्यापक सुभाष दरेकर, सौ. सुनीता धनक, श्री. काशिनाथ लव्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शोकसभेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी, “दादांसारखे धडाडीचे नेतृत्व रयत परिवाराने गमावले आहे,” अशी भावना व्यक्त केली.उपस्थित मान्यवरांपैकी श्री. शिवाजीराव लंके यांनी स्व. अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत वेदनादायक घटना असून त्यांचे नेतृत्व केवळ प्रशासनापुरते मर्यादित नव्हते, असे नमूद केले. श्री. अरुण चंद्रे यांनी लोकनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्व. अजितदादा पवार असल्याचे सांगितले. महेंद्रशेठ काले यांनी स्व. अजितदादा पवार यांचा राजकीय जीवनपट उलगडून सांगताना अर्थ, जलसंधारण व ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. जनरल बॉडी सदस्य मा. पद्माकांत कुदळे यांनी अजितदादांच्या जाण्याने प्रत्येक घरातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली. तसेच समाजमाध्यमांतून गेल्या काही दिवसांत दादांचे विविध पैलू समाजासमोर आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शोकसभेचे अध्यक्षस्थान महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व जनरल बॉडी सदस्य ड. संदीप वर्षे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी स्व. अजितदादा पवार यांचे जाणे ही मराठी समाजासाठी मोठी हानी असल्याचे सांगितले. समाजमाध्यमांतून त्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास होत असला, तरी प्रत्यक्षात त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत जबाबदार व संवेदनशील होते. रयत शिक्षण संस्थेवर त्यांचे विशेष प्रेम होते तसेच कार्यकर्त्यांनी निर्व्यसनी राहावे यासाठी ते नेहमीच आग्रह धरत असत, असेही त्यांनी स्पष्ट केले.शोकसभेचा समारोप पसायदानाने करण्यात आला. स्व. अजितदादा पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी कोपरगाव शहर रयत शैक्षणिक संकुलातील सर्व प्राध्यापक व सेवकवृंद उपस्थित होता. संपूर्ण शोकसभा अतिशय भावमग्न वातावरणात पार पडली.


