लेखणीतुन माणसाचं मन व्यक्त होते-सौ. स्नेहलताताई कोल्हे
साहित्यीक कवी प्रशांत वाघ, संजय वाघ व सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी राजेश वाघ यांनी त्यांचे वडील स्व. शहादु शिवाजी वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमचा बाप आणि त्यांच्या विषयी हे पुस्तक प्रकाशित केले त्याचे प्रकाशन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच झाले. (छाया – चंद्रमा फोटो, कोपरगांव)
लेखणीतुन माणसाचं मन व्यक्त होते-सौ. स्नेहलताताई कोल्हे
कोपरगांव :- साहित्य हे प्रतिभेचे लक्षण आहे, आई-वडील ही प्रत्येकाच्या जीवनातील मौलिक संपत्ती आहे, मन व्यक्त होण्यांसाठी लेखणी हे उत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.तालुक्यातील नाटेगांव येथील पांडुरंगकृपा लॉन्स मध्ये पिंपळगांव जलाल निवासी वाघ कुटूंबाचे साहित्यीक कवी प्रशांत वाघ, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीचे संगणक चालक संजय वाघ व सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी राजेश वाघ यांनी त्यांचे वडील स्व. शहादु शिवाजी वाघ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमचा बाप आणि त्यांच्या विषयी या पुस्तकाचे प्रकाशन सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक गो. तु. पाटील होते.
याप्रसंगी डॉ. कृष्णा भवारी यांच्या कथा, संतोष कांबळे यांच्या गझल संग्रहाला तर सुवर्णा पवार यांच्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार देण्यांत आले यासाठी राज्यभरातुन ७० साहित्यीकांच्या प्रवेशिका आल्या होत्या. दुस-या सत्रात राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन झाले. स्व. शहादु वाघ यांच्या पोष्ट तिकीटाचेही सौ. कोल्हे यांच्या हस्ते अनावरण करण्यांत आले.
प्रारंभी साहित्यीक कवी प्रशांत वाघ यांनी प्रास्तविकांत आई वडीलांनी दिलेल्या संस्काराची माहिती देवुन त्यांच्या आयूष्यातील ठळक घटना समाजासमोर आणल्या. याप्रसंगी शब्दगंध साहित्यीक परिषदेचे सुनिल गोसावी, कार्यवाहक कवी सुभाष सोनवणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या माया पगारे, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, प्रभाकर सुर्यवंशी, परिक्षक संजय पठाडे, स्वाती ठुबे, साहित्यीका विमल वाणी, चित्रकार अरविंद शेलार, कवी आनंदा साळवे, निलीमा साळवे, रिता जाधव, अभिनव खांदेशी, हेमचंद्र भवर, रवी धस, डी. सी. निकम, सरपंच राजेश्वर पारखे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर, साहित्यीक, कवी, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, स्व. शहादु शिवाजी वाघ यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबरोबर काम केले. यशवंत कुक्कुट पालन संस्थेत ते वाघ चालक या नावानेच सर्वांना परिचित होते. कष्टाने त्यांनी आपल्या कुटंबाला घडविले. प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडीलांच्या जागेला अनन्य साधारण महत्व आहे., त्याची जाण पुढच्या पिढीने ठेवली आणि त्यांच्याविषयीच्या भावना पुस्तकाच्या रूपाने जगासमोर आणल्या आहेत. अध्यक्षपदावरून बोलतांना गो. तु. पाटील म्हणाले की, समाजाचे प्रतिबिंब साहित्य आहे. तेच माणसाला जीवनांत आढळस्थान देते. वाघ कुटूंबाने बापाविषयीची कृतज्ञता पुस्तकाच्या माध्यमांतुन सर्वासमोर ठेवली आहे. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीचे संजय वाघ यांनी आभार मानले.



