आंतरविद्याशाखीय शिक्षण हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य”-डॉ. विजय कुंभार
आंतरविद्याशाखीय शिक्षण हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य”-डॉ. विजय कुंभार
कोपरगाव-” कोठारी आयोगाने परिस्थितीनुरूप बदल घडविणारे शैक्षणिक धोरण आखून क्रांती केली. त्यानंतर आता आजच्या काळाच्या व नवतंत्रज्ञान युगाच्या गरजेनुसार रोजगार व व्यवसायभिमुख शिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. याविषयीच्या चिंतनातूनच जुलै 2020 मध्ये नवे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ अस्तित्वात आले आहे. या धोरणाचे स्पेशल व मायक्रो स्पेशल ऐवजी आंतरविद्याशाखीय शिक्षण देणे हे एक ठळक व महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. विजय कुंभार यांनी केले.येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर ऑनलाइन स्वरूपात संपन्न झालेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती देताना त्यांनी, पुढील काळात महाविद्यालयांना निवडावे लागणारे पर्याय, त्यासाठीची आवश्यक पात्रता, विद्यापीठात रूपांतरित होण्याची संधी, त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या,अनुदान पद्धती याविषयी सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले. तसेच आव्हाने स्वीकारून विद्यापीठ रूपाने स्वतंत्र प्रतिमा निर्मिण्याची महाविद्यालयांना मोठी संधी आहे, असे विचार व्यक्त केले.


या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. रमेश सानप हे होते. अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी सांगितले की, येणारे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे क्रांतिकारी असून त्याला सामोरे जाताना शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांची जबाबदारी वाढणार आहे. वाढत्या जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकाने काम करणे आवश्यक आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका कथन प्राध्यापक डॉ.भागवत यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी व्यक्त केले. प्रा. एम.आर. यशवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.



