क्रिडा व मनोरंजन

गावखेड्यातील मराठी बोली जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मराठीच्या मरणाची भीती नाही!- सुधीर कोयटे

गावखेड्यातील मराठी बोली जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मराठीच्या मरणाची भीती नाही!- सुधीर कोयटे

कोपरगाव- इंग्रजीत प्रतिक्रिया देण्यापेक्षाही’ येड्याचा बाजार, खुळ्याची चावडी’ यासारख्या बोलीतून दिली जाणारी प्रतिक्रिया ही बोलणाऱ्याच्या जिवंतपणाचा अनुभव देणारी, ठसकेबाज अशी असते. मराठीचे वैभव असणाऱ्या अशा बोली जोपर्यंत गाव खेड्यातून बोलल्या  जातील तोपर्यंत; मराठीच्या मरणाची भीती नाही”असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मराठी साहित्य परिषदेच्या कोपरगाव शाखेचे कार्याध्यक्ष मा. सुधीर कोयटे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला शब्दकोश निर्माण करून राज्यव्यवहारासाठी मराठी भाषेला प्राधान्य दिले.  असे सांगून श्री.कोयटे यांनी, अनेक आक्रमणानंतरही मराठी जशी जिवंत राहिली तशी यापुढेही बोलींच्या योगदानामुळे ती जिवंत राहणारच असे ठामपणे सांगताना मराठीच्या जतनासाठी महात्मा फुले, कवी मोरोपंत, अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी कुसुमाग्रज यासारख्या अनेकांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. तसेच मराठी बोला, मराठी वाचा, मराठीत लिहा. कारण यातूनच मराठीचे अस्तित्व आणि गोडवा टिकून राहणार आहे असेही पुढे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी आपल्या काही वात्रटिकाही सादर केल्या.येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आणि सूर्यतेज व महाराष्ट्र साहित्य परिषद, कोपरगाव शाखा यांच्या सहकार्याने नुकताच कवी कुसुमाग्रज जन्मदिन हा ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी श्री. कोयटे  प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. सानप आणि प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद कोपरगाव शाखेचे  अध्यक्ष श्री. हिरालाल महानुभाव तसेच सूर्यतेज संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री.सुशांत  घोडके हेही उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला अंकुर भित्तीपत्रकाचे अनावरण व  कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ.हिरालाल महानुभाव यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगून,आपण मराठीच्या प्रेमात पडल्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याकडे कसे ओढले गेलो  याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वेळीच आपल्या भविष्याची दिशा ठरवल्यास यश निश्चित मिळते असे विचार त्यांनी मांडले.श्री.सुशांत घोडके यांनी कुसुमाग्रज आणि मराठी भाषा गौरवदिन यांच्या अनुबंधाबद्दल सांगताना प्रत्येकाच्या रेशन कार्डवर कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ ही कविता असल्याची आठवण करून दिली.तसेच शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’या  नाटकातील कथा भाग हा कोपरगावच्या परिसरातच घडलेला असल्याने मराठी साहित्य, कुसुमाग्रज आणि कोपरगाव यांचा एक वेगळा ऋणानुबंध असल्याचे उलगडून दाखविले. झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकरांसारख्या देश विदेशातील व्यक्तींच्या उदाहरणाद्वारे त्यांनी मराठी माणसाचे यश आणि योगदान स्पष्ट केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाष्य करताना प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी, आपल्याकडे अनेक दिन साजरे केले जातात. मात्र विद्यार्थ्यांना त्यामागील उद्देशच माहीत नसतो, अशी खंत व्यक्त करून कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, केशवसुत या  मराठीचा पाया घालणाऱ्या थोर साहित्यिकांचे कार्य विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे. त्यांच्या साहित्यकृतींचे वाचन करावे. त्यातूनच मराठीची गोडी निर्माण होईल आणि मराठी समृद्ध होण्याच्या दृष्टीने काही घडेल,असे सांगितले.मराठी विभागातील सुहास भालेराव, स्वप्नील थोरात या विद्यार्थ्यांनी सदर प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून काही कविता सादर केल्या. कार्यक्रमात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर चा पुरस्कार मिळाल्याबद्दल  प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे,प्रा. छाया शिंदे,प्रा. बाबासाहेब वाघ  यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.उज्ज्वला भोर यांनी केले सदर प्रास्ताविकातून त्यांनी  कवी कुसुमाग्रज जन्मदिन व  जागतिक मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.  तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सीमा चव्हाण   यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी कला शाखेचे   उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ.अर्जुन भागवत, हिंदी  विभाग प्रमुख प्रा.डॉ.रंजना वर्दे, प्रा. सुनील काकडे,.प्रा.प्रदीप जगझाप ,प्रा.रावसाहेब दहे,प्रा.अक्षय आहेर, यांसह  कार्यालयीन अधीक्षक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे