जीवनात संयम आवश्यक
रमजानुलमुबारक – ३
जीवनात संयम आवश्यक
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
9226408082.
पवित्र रमजान महिना हा अल्लाहचा महिना असल्याने या महिन्यातील प्रत्येक कार्याचे पुण्य सत्तर पट असते.रमजान महिना म्हणजे सत्कार्याचा महापूरच.महिनाभर सर्वांची दिनचर्या बदललेली असते. सहेरी,नमाज,तीलावत, अल्लाहचे नामस्मरण इत्यादी धार्मिक विधी मध्ये दिवस निघून जातो.अल्लाहचे नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते. कुरआन पठण केल्याने कुरआनामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ समजण्यास मदत होते. म्हणून कुरआन शरीफ वाचतांना तो आपल्या भाषेत भाषांतरित असला तर अधिक उत्तम. मराठी भाषेत सुद्धा भाषांतर उपलब्ध आहे. वारंवार वाचन केल्याने कुरआनचा अर्थ आपल्याला कळतो. अल्लाहनिर्मित ग्रंथ असल्याने आणि तो मूळ अरबी भाषेत असल्याने ती भाषा आणि त्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन आपण कुरआन चा अर्थ लावला पाहिजे.
भारतीय राज्य घटनेत देखील कुरआन शरीफ ला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच एका माथेफिरूने सर्वोच्च न्यायालयात कुरआन मधील काही आयती विरोधात दाखल केलेली याचिका घटनेमधील तरतुदींचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने नुसतीच फेटाळली नाही तर संबंधिताला 50 हजार रुपयांचा दंड केला. केवळ राजकीय उद्देशासाठी अशा पद्धतीच्या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु यातून कुरआनशरीफ बद्दल इतर धर्मीयांमध्ये असलेले औत्सुक्य आणखी वाढीस लागले.भारतातील मराठी भाषेसह सर्व भाषांमध्ये कुरआन शरीफचे भाषांतर उपलब्ध असून लोक त्यांचे वाचन करून कुरआनबद्दलचे आपले ज्ञान समृद्ध करून घेत आहेत. रमजान महिन्यामध्ये कुरआन शरीफचे पृथ्वीतलावर अवतरण झाले असल्याकारणाने या महिन्यात विशेष करून कुरआनचे वाचन,पठण केले जाते.
कुरआन हा साक्षात अल्लाहची किताब असून पृथ्वीवरील लोकांच्या भल्यासाठी त्यामध्ये आवश्यक त्या सर्व बाबी नमूद केल्या आहेत.कोणती संकटे येणार आहेत याचे सूतोवाच करतानाच त्यापासून सुटका कशी करावी याचे मार्गदर्शन देखील त्यात केलेले आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण कसे वागावे याचे मार्गदर्शन आहे. रोजचे व्यवहार करताना कोणती पद्धती अमलात आणावी, व्यापार-उदीम करताना नफा किती असावा हे सुद्धा त्यात नमूद केले आहे. दररोज घडणाऱ्या प्रत्येक व्यवहारांमध्ये आपली भूमिका काय असावी याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी दररोज कुरआन शरीफचे वाचन करून त्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. केवळ वाचून मनाचे समाधान न करता आपल्या मातृभाषेत किंवा आपल्याला समजेल अशा भाषेत तो वाचावा म्हणजे आपले ज्ञान अद्ययावत होण्यास आणि अंमलबजावणी करण्यास सोयीचे जाते.प्रत्येक गोष्टी मध्ये नेहमी संयम बाळगावा. सयंम बाळगल्याने कामे सुकर होतात. आततायीपणा विनाशाकडे नेतो. (क्रमश 🙂
**********************



