स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी मान्य;गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना ७ नं. पाणी मागणी अर्ज भरण्यास २३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी मान्य;गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना ७ नं. पाणी मागणी अर्ज भरण्यास २३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
–लाभधारक शेतकऱ्यांनी मानले स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार
संपादक;- रविंद्र जगताप
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या मागणीवरून जलसंपदा विभागाने गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास येत्या २३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्याबद्दल लाभधारक शेतकऱ्यांनी स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी पाणी घेण्याकरिता ७ नंबर नमुना अर्ज दाखल न केलेल्या लाभधारक शेतकऱ्यांनी तातडीने आपले पाणी मागणी अर्ज जलसंपदा विभागाकडे दाखल करावेत, असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.


गोदावरी डावा व उजवा कालव्यांतून पाणी घेण्यासाठी जलसंपदा विभागाने लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांकडून १५ ऑगस्टपर्यंत नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज मागविले होते. मात्र, शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना मुदत वाढवून देण्याची मागणी कोपरगावच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कोपरगाव येथील गोदावरी डावा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता आणि राहाता येथील गोदावरी उजवा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

कोपरगाव व राहाता या दोन्ही अवर्षणप्रवण तालुक्यांना दारणा धरणातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. या दोन्ही तालुक्यातील शेतकरी गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे मिळणाऱ्या पाण्यावरच पिके घेतात. गेल्या दोन महिन्यांपासून कोपरगाव व राहाता तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने गोदावरी डावा व उजवा कालव्यांतून बिगरसिंचनासाठी सोडलेल्या आवर्तनातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यातच जलसंपदा विभागाने गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून खरीप हंगाम २०२३- २४ मधील सिंचनासाठी नमुना नं. ७ द्वारे पाणी मागणी करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले होते. सध्या गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या नियोजनाची कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या नियोजनात अडकल्याने गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी पाणी घेण्याकरिता नमुना नं. ७ पाणी मागणी अर्ज अद्याप जलसंपदा खात्याकडे दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे गोदावरी कालवा लाभधारक शेतकऱ्यांना नमुना नं. ७ पाणी मागणी अर्ज सादर करण्यास दिलेली १५ ऑगस्टरची मुदत वाढवून देण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांना नमुना नं. ७ पाणी मागणी अर्ज सादर करून सिंचनासाठी पाण्याचा लाभ घेता येईल, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी जलसंपदा विभागाचे नाशिकचे कार्यकारी अभियंता, कोपरगावचे गोदावरी डावा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता व राहाता येथील गोदावरी उजवा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे केली होती. स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेली मागणी जलसंपदा विभागाने मान्य केली असून, गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास २३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
