धार्मिक

भैरवनाथांची अर्धांगिनी जोगेश्वरीचे माहेर धोत्रे गाव,अरुण खरात 

भैरवनाथांची अर्धांगिनी जोगेश्वरीचे माहेर धोत्रे गाव,अरुण खरात 

महाराष्ट्र व इतर राज्यातील जे भैरवनाथ जोगेश्वरी चे देवस्थान आहे त्या प्रत्येक देवस्थानची दंतकथा व आख्यायिका वेगवेगळ्या सांगितल्या जातात. प्रत्येक ठिकाणच्या भैरवनाथ जोगेश्वरीच्या मूर्तीचे रूप रंग ही वेगवेगळे आहेत. जत्रा उत्सव हि वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ जोगेश्वरी ची ही वेगळीच अशी आख्यायिका, दंतकथा सांगितली जाते. येथील भैरवनाथाचे नाते कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील जोगेश्वरी देवस्थानशी सांगितल्या जाते. भैरवनाथांची पत्नी जोगेश्वरी हि आमच्याच घराण्यातील असल्याचे धोत्रे येथील पोटे बंधू सांगतात. धोत्रे हे जोगेश्वरीचे माहेर आहे हे वर्षानुवर्ष लोक ऐकत आलेले आहेत. धार्मिक ग्रंथात याचा कुठेच उल्लेख आढळत नसला तरी धोत्रे येथील जोगेश्वरीचे मंदिर याची साक्ष देते. येथे जोगेश्वरी बरोबर भैरवनाथांची मुर्ती आहेच हे मंदिर बाराशे वर्ष पुरातन असल्याचे सांगितले जाते. येथील मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिरा समोरील दिपमाळ पुरातन असून सुस्थितीत आहे. चांदेकसारे येथील भैरवनाथांचे मंदिर हि बाराशे वर्ष पुरातन आहे. नुकतेच धोत्रे येथे दि. 26 ऑक्टोबर 2023 रोजी जोगेश्वरी व भैरवनाथ यांचे वज्रलेप केलेल्या 1200 वर्ष पुरातन स्वयंभू मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी गवंडगाव आश्रमाचे हभप गोविंदगिरीजी महाराज उपस्थित होते. नंतर या मंदिरास श्री क्षेत्र सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज तसेच ढवळा आश्रम चे हभप भरत महाराज यांनी भेट दिली. समस्त पोटे परीवारा बरोबरच धोत्रे गावातील सर्वच गावकरी मंडळींनी मंदिर जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला होता. ह्या सोहळ्यास मी ही उपस्थित होतो हे मी माझे भाग्य समजतो. मी नेहमीच भैरवनाथ जोगेश्वरी विषयी लिखाण करून देवस्थानचे प्रचार प्रसारचे निस्वार्थी पणाने काम करत असल्याने गावकरी मंडळींनी त्यावेळी माझा चांगला आदर सत्कार केला.चैत्र शुद्ध त्रयोदशीला चांदेकसारे येथील भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेला पोटे कंपनी आवर्जून उपस्थित राहते. पोटे बंधूनां येथे साशन काठीचा मान आहे. रथामध्ये सजवलेल्या भैरवनाथ जोगेश्वरीच्या मुखवट्यांच्या मिरवणुकीसमोर पोटे परीवारातील तरूण डफ वाजवत, नाचत अत्यंत धाडसाने काठीला वेगवेगळ्या प्रकारात खेळवत आपली पिढ्यांन पिढ्यांची परंपरा जपत आहेत. भैरवनाथ जोगेश्वरी च्या यात्रेला म्हणजेच लग्न सोहळ्याला येतांना ही प्रमुख व-हाडी मंडळी आपल्या सोबत अक्षदा (तांदूळ) ही घेऊन आलेली असतात भैरवनाथ जोगेश्वरीच्या रथ मिरवणुकीच्या वेळी पोटे परिवारा बरोबरच उपस्थित सर्वच भाविक भक्त अक्षदांचा वर्षाव करत असतात.
पूर्वी भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेच्या वेळी जुन्या मंदिरात असलेल्या खोल्यांमध्ये पोटे परिवाराचे लोक चार पाच दिवस मुक्कामी थांबून यात्रा उत्सवाचा आनंद लुटत होते असे चांदेकसारेतील वयोवृद्ध लोक सांगतात. सध्या दळणवळणाची साधने वाढल्यामुळे दोन दिवस का होईना धोत्रे, वैजापूर , कोपरगाव तसेच इतर ठिकाणी नोकरी व्यवसाया निमित्ताने पांगलेले पोटे परिवाराचे भावकीतील लोक सगळे सगे- सोयरे व लेकी बाळी चांदेकसारे येथील भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवाच्या वेळी बारवा जवळील चिंचेच्या झाडाखाली सर्व जमा होतात.‌ पुर्वी येथे दगडी चबुतरा होता परंतु रस्ता रुंदीकरणात तो नामशेष झाला तेथे सध्या ही दगडांचे अवशेष आहेत.यात्रेवेळी येथे जमलेली मंडळी सुख दुःखाच्या गप्पात रंगलेली असतात. कुणी भैरवनाथ जोगेश्वरीला केलेले नवस फेडतात. सर्वच एकत्रित जेवणाचा आस्वाद घेतात.

सध्या भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा मिरवणुकीत हवसे, गवसे, नवसे यांचा धांगडधिंगाणा वाढल्यामुळे साशन काठीचे मानकरी असलेले लोकांना व्यवस्थितरीत्या डफ वाजवत काठी मिरवता येत नाही. काठीचे कला कौशल्य सादर करता येत नाही. त्यामुळे काठीचे मानकरी केवळ देवाला काठी दाखवून मिरवणुकीतून निघून जातात. माझी चांदेकसारे गावातील सर्व गावकरी, भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा कमिटी, श्रीराम रतन पंचायतन ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांना नम्र विनंती आहे की भैरवनाथ जोगेश्वरी च्या सर्व मानकरी मंडळींचा योग्य मानसन्मान केला पाहिजे. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी यात्रेत झाल्या तरच यात्रेला महत्त्व प्राप्त होते व यात्रेची रंगत वाढते. परंपरा व श्रध्देची जोड असलेली काठी मिरवणूक हे भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवाचे खास आकर्षण आहे. धोत्रे येथील माता जोगेश्वरीच्या माय माहेरची माणसं आपल्या चांदेकसारे गावातून हसत मुखाने गेली तर निश्चितच जोगेश्वरी बरोबरच भैरवनाथ खुष होवून आशिर्वाद देतील. चला आपण सर्व मिळून चांदेकसारे व धोत्रे गावचे हे आगळेवेगळे नाते जपूया…
—————-
लेखक — अरुण श्रावण खरात.
मु.पो. चांदेकसारे , ता. कोपरगाव, जि. नगर.



सत्य एक्सप्रॆस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे