धार्मिक

वारकरी आणि भजन यांचे अतूट नाते इंदिरा एकादशीच्या निमित्ताने…

वारकरी आणि भजन यांचे अतूट नाते इंदिरा एकादशीच्या निमित्ताने…

 मानवाच्या मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजन होय. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे छंद असतात.कोणी लेखन,वाचन,गायन, चिंतन, मनन, व ध्यान करतात. तर कोणी भजन,भारुडे,नाटक,गवळण , कीर्तन,सादर करतात,आज निखळ मनोरंजन होणे अतिशय गरजेचे आहे. आज धकाधकीच्या जीवनात व्यक्तीला फावला वेळ आवश्यक आहे; या वेळेत मनाला उत्साह वाढवण्यासाठी आपल्याला आवडणारे छंद जोपासावे लागतात, काही व्यक्ती सण- सोहळे साजरे करून नाचून -गाऊन एखादा कार्यक्रम साजरा करतात.अशी वेगवेगळी मनोरंजनाची साधने आहेत या सर्व साधनांमध्ये भजन हा मनोरंजनाचा वारकरी संप्रदायाचा काव्य गायनाचा उत्तम कार्यक्रम आहे, वारकरी संप्रदायात भजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. टाळ, मृदंग, विना, पखवाज चिपळ्या, पेटी या साधनांनी भजन गायले जाते, दिवसभर कष्ट केलेल्या लोकांना सायंकाळी भजन गाऊन मनाला विश्रांती देऊन आनंद व्यक्त करता येतो. म्हणून आज गावोगावी भजन म्हटले जाते.पवित्र अशा श्रावण महिन्यात अनेक ठिकाणी पोथी, पुराणे वाचले जातात. तसेच चातुर्मासही केला जातो. म्हणजेच चार महिने देवाची आराधना केली जाते. भजनातून ईश्वराला आपलेसे करता येते; नामस्मरण करून परमेश्वरा जवळ जाता येते अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे.

जाहिरात

संत गाडगे महाराजांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन करून प्रचंड जनसमुदायाला माना डोलायला लावल्या, महाराष्ट्रात सर्वत्र खेडोपाडी आजही म्हणजेच सायंकाळी हरिपाठ म्हणतात; म्हणजेच देवाची आळवणी करतात. भजन म्हणजे मनाची एकाग्रता होय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाचे नाव खंजिरी भजन असे होते, सात खंजिरी वाजून ते भजन करून आलेल्या भक्तांना मंत्रमुग्ध करतअसत, भजनामुळे व्यक्तीच्या मनात असलेली अंधश्रद्धा निघून जाते. मन परिवर्तन होते. भजन हा योगसाधनेतील भक्ती योगाचा भाग आहे. महाराष्ट्रातील ही लोककला आहे. भजन आणि अभंग मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आले आहेत. सामाजिक जडणघडणीमध्ये अभंगाचा फार मोठा वाट आहे, कधीच भंग न होणारे अभंग असे म्हटले जातेउत्तर भारतात संत मीराबाईनी पती निधनानंतर श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्णाशिवाय त्यांना या जगात कोणी जवळचा वाटला नाही. दिन -रात्र त्या त्यांचा ध्यास करीत होत्या.*ऐसी लागी लगन । मीरा हो गई मगन* असे सुंदर भजन तिच्या विषयी गायले जाते. महाकवी सूरदासानी अनेक भजने गायले आहेत. तसेच संत तुलसीदास यांनी आपले जीवन भजनात घालवले आहे म्हणून भजन हे परिवर्तनवादी साधन आहे. मनाला निर्मळ करणारे साधन आहे. महाराष्ट्रामध्ये भजनाचे दोन प्रकार आहेत. एक चक्रीभजन हे भजन न थांबता गायले जाते. दोन सोंगी भजन भक्त देवाची भूमिका घेऊन संवाद रूपाने भजन गायले जाते. समाज जोडण्याचे काम भजन करते, ग्रामीण भागामध्ये बाराबलुतेदार व अठरा आलुतेदार हे सर्व कमी जास्त प्रमाणात आपल्या फावल्या वेळामध्ये भजनात आपला वेळ घालवितात, , समाज जोडण्याचे काम भजन करीत असते,अनेक जाती-धर्माचे लोक एकत्रित बसून सायंकाळी भजन करतात; त्या भजनामुळे एकमेकांमधील भेदभाव विसरले जातात ,पंढरपूरला सर्व वारकरी एकत्रच आल्यानंतर *या रे या रे लहान थोर।याती भलती नारी नर* ।।हा अभंग गाऊन समानता दर्शविली जाते, म्हणून भजनामध्ये समानतेचे तत्व रुजलेले आहेत.

जाहिरात

संत जनाबाईंनी,संत बहिणाबाईंनी, आपल्या भजनामधून विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्यासाठी भजने गायली आहेत. भजनामुळे साधुसंत देवाला प्रसन्न करून घेतले, देव भक्तीचा भुकेला असतो, म्हणून भजनामधूनच कबीरांनी समाजातील लोकांना एकत्रित आणले,अंधश्रद्धेवर टीका केल्या, भेदभाव नाहीसे केले या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भजन हे साधन नवसंजीवनी ठरले,भजनामुळे इतर व्यक्तीमधील राग, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा या गोष्टी नाहीशा होतात, भगवंतांच्या दारामध्ये समानता शिकवली जाते, म्हणून भजन ,आरत्या भोपळ्या, कीर्तन, हरिपाठ जतन करून ठेवले आहे, अखंड हरिनाम सप्ताह , भागवत लावून भजन केले जातात, आणि भजनामध्ये एकात्मतेचे रूपे दिसतात; या ठिकाणी सर्व जण एकत्र येतात हा महत्त्वाचा संदेश भजना मधून आपल्याला मिळतो. आद्य कीर्तनकार संत नामदेव महाराज यांच्यापासून हे भजन सुरुवात झाले असे आपण म्हणत असलो तरी त्या अगोदर सुद्धा अनेक संतांनी भजनाची सुरुवात केली अशी पुरावे सापडतात. दरबारामध्ये सुद्धा भजन गायली जात होती. त्यामुळे भजन हा वारकऱ्यांचा श्वास आहे, अंगात पांढरा शुभ्र सदरा, धोतर,डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, मस्तकावर गोपीचंदनाचा टिळा, अष्टगंध बुक्क हे वारकरी लावून गळ्यात टाळ घेऊन भजन गातात. त्यामुळे देवाची आराधना करून पुण्य मिळवतात ;त्यामुळे गावागावातून हरिनामाचा गजर होतो, पालख्या दिंड्या, पताके घेऊन भक्त भजन गातात, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राकडे पायी दिंडी घेऊन ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता जातात.*विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ*।।या अभंगातून असे निरूपण केले जाते की भेद करू नका? हे भजन गाऊन आपणाला वारकरी समानतेकडे नेऊन सोडतात, अनेक समाजामध्ये त्यांच्या बोलीभाषे तील भजन गायले जातात, त्यामुळे समाज एकत्रित येतो, सुखदुःखाच्या गोष्टी करतो, दर पंधरवड्यात एकादशीला देवळात, मठात,मंदिरात,पारावर, आश्रमात भजन केले जातात, त्यामुळे लहाना पासून थोरापर्यंत एकत्र येऊन भजन करतात, पंढरपूर व आळंदी येथे वारकरी संप्रदायांचे भजन शिकवण्या साठी वारकरी शिक्षण संस्था आहेत येथे टाळ, पखवाज, खंजिरी ,विना वाजवणे, कीर्तन करणे असे या वारकरी संस्था अध्यात्मातील सर्व गोष्टी शिकवतात व समाज परिवर्तन करण्यासाठी चांगले अभंग घेऊन त्याचे निरूपण करून समाज घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, समाजामध्ये वारकरी संप्रदाय आहे; म्हणूनच शांतता आहे असे मला वाटते.
अनेक अभंगातून वागावे कसे याचा अर्थ सांगितले जातात, *आता तरी पुढे हा ची उपदेश। नको करू नाश आयुष्याचा*।।त्याचे सार सांगितले जातात,त्यामुळे बुवा, बाबा कीर्तनकार, महाराज, महंत आपल्या भजनातून उपदेश करून समाजाला जागृत करतात, समाजातील हेवेदावे कमी करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून हे भजन गायलेच पाहिजे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली,संत नामदेव, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत बहिणाबाई, संत जनाबाई ,संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा ,संत नरहरी सोनार, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत गोरोबा कुंभार, संत कबीर, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज,संत नरसी मेहता, राष्ट्रसंत वट्टेमोड महाराज या सर्वांनीच अतिशय सुंदर भजन गाऊन ,कीर्तन करून समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण केला. त्यांनी समाजाला भक्तीचा मार्ग दाखविला; त्यामुळे समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदू लागला. म्हणून भजन म्हणजे समाज जोडण्याचे महत्त्वाचं साधन आहे ,यात तीळ मात्र शंका नाही, सध्या ह,भ,प इंदुरीकर महाराज, ह,भ,प बाबा महाराज सातारकर , ह,भ,प पुरुषोत्तम महाराज, ह,भ,प रामराव ढोक महाराज अशा अनेक महाराजांनी भजन ,कीर्तनातून समाजाचे प्रबोधन करीत आहेत, ही वारकरी संप्रदाया तील सर्वात मोठी सकारात्मक बाजू आहे .अलीकडच्या काळामध्ये भजन गायनासाठी तरुण मुलं मंदिरात जात नाहीत, सदैव हातात मोबाईल घेऊन बसत आहेत, ज्या काही जुन्या लोककला आहेत त्या लोप पावतात काय? अशी भीती सुद्धा मनात निर्माण होत आहे .गावोगावी फक्त जुन्या पिढीतीलच व्यक्ती भजन करत आहेत त्यांनीच ही परंपरा चालू ठेवली आहे ,
नवीन व्यक्ती भजन करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
म्हणून भजन गायनासाठी समाजात तरुणांनी पुढाकार घेऊन फावल्या वेळेत जर चांगले कार्य केले तर भजना मधून सुद्धा समाज परिवर्तन होते. हे एक चांगलं कार्य आपल्या हातून घडते. दररोज जरी भजन गाणे शक्य नाही झालं तरी अखंड हरिनाम सप्ताह, आषाढी ,कार्तिकी एकादशी चातुर्मास ,प्रासंगिक वेळेला केले जाते, भजना करताना ज्येष्ठ व वृद्ध लोकांनी तरुणांना संधी देऊन भजनात गोडवा निर्माण करावा, व तरूणांनी त्यांना सहकार्य करावे. तेव्हाच वारकरी संप्रदाय आणि भजन यांचे अतूट नाते आहे ,असे आपणांस जगाला ओरडून सांगता येते.
शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान
खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे