‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ उपक्रमास कोपरगाव मतदार संघात प्रारंभ
एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित करतांना ना. आशुतोष काळे. .
‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ उपक्रमास कोपरगाव मतदार संघात प्रारंभ
ना. आशुतोष काळेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
कोपरगाव प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे राज्याच्या विकासाचे विचार घराघरात पोहोचावे यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून शनिवार (दि.२) रोजी गुढीपाडव्यापासून हा उपक्रम कोपरगाव विधानसभा मतदार संघात राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी देखील त्यांच्या गावी माहेगाव देशमुख येथे या उपक्रमाचा प्रारंभ करून कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विचारांची देवाण घेवाण होवून राज्याचा समृद्ध, सर्वांगीण विकास व्हावा हा त्यामागे उद्देश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य अनेक संकटाचा सामना करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे हे कोपरगाव मतदार संघाचा अडीच वर्षात प्रतिकूल परिस्थितीत झालेला सर्वांगीण विकास सांगतो आहे. अजूनही कशा प्रकारे अधिक विकास साधता येईल, सर्वसामान्य नागरीकांच्या अजून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेवून आपल्या गावाचा, शहराचा जास्तीत जास्त विकास कसा साधला जाईल त्यासाठी हा उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबूत संघठन करून राष्ट्रवादीच्या विचारांची फळी निर्माण करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा अडीच वर्षात झालेला विकास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि घराघरात पोहोचवा असे त्यांनी आवाहन केले. यावेळी माहेगाव देशमुख येथील श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी ना. आशुतोष काळे यांनी ४९.९७ लक्ष निधी मिळवून दिल्याबद्दल माहेगाव देशमुख ग्रामस्थ व श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संभाजीराव काळे, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनराव काळे, सोसायटीचे चेअरमन संजय काळे, उपसरपंच विकास रणशिंग, बापूसाहेब जाधव, अशोकराव विश्वनाथ काळे, मधुकर काळे, विठ्ठलराव लांडगे, साहेबराव देशमुख, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गावागावात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम उत्स्फुर्तपणे राबविला.


