आरोग्य व शिक्षण

कोपरगावात लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या ‘पेट्रोल डर्ट बाईक्स’वर तात्काळ जप्तीची कारवाई करा, अन्यथा  तीव्र ठिय्या आंदोलन !

कोपरगावात लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या ‘पेट्रोल डर्ट बाईक्स’वर तात्काळ जप्तीची कारवाई करा, अन्यथा  तीव्र ठिय्या आंदोलन !

पालकांनो सावधान! मुलांच्या हातात अनधिकृत गाड्या दिल्यास थेट २५ हजारांचा दंड आणि ३ वर्षांची जेल ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेचा कडक इशारा

.केंद्रीय मोटर वाहन कायद्याचे उघड उल्लंघन; चुकीच्या गाड्या विकणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करून दुकाने ‘सील’ करण्याची आग्रही मागणी

कोपरगाव:कोपरगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून ७ ते १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलांकडून मुख्य बाजारपेठ आणि रहदारीच्या अंतर्गत रस्त्यांवर अत्यंत बेदरकारपणे पेट्रोल डर्ट बाईक्स (Mini Petrol Dirt Bikes) चालवण्याचे प्रमाण भयानक वाढले आहे. या अनधिकृत गाड्यांमुळे शहरात निष्पाप पादचारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला व जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. या जीवघेण्या समस्येची गंभीर दखल घेत ‘माझा गाव माझा अभिमान, कोपरगांवकर’ संघटनेच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), तहसीलदार, मुख्य अधिकारी आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला अत्यंत कडक शब्दांत इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले. पुढील १० दिवसांत या बेकायदेशीर गाड्यांची विक्री आणि वापर पूर्णपणे बंद न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

या संदर्भात संघटनेचे पदाधिकारी विनय भगत, विजय जाधव, अमित आढाव आणि मयूर आव्हाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, या गाड्या जरी आकाराने लहान दिसत असल्या, तरी त्या ५०cc क्षमतेच्या वेगवान पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या आहेत. या गाड्यांना कोणतीही आरटीओ (RTO) नंबर प्लेट नाही की कोणताही विमा नाही. शहरात एखादा मोठा जीवघेणा अपघात घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शहरातील काही सायकल विक्रेते आणि ऑटोमोबाईल व्यावसायिक निव्वळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पालकांची फसवणूक करून “या गाड्यांना लायसन्स लागत नाही” असे सांगून २५ ते ३० हजार रुपयांना या चिनी बनावटीच्या गाड्या विकत आहेत. केंद्रीय मोटर वाहन कायद्याच्या कलम १८२अ नुसार अशा अनधिकृत गाड्या विकणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. या दुकानदारांचे ‘शॉप ॲक्ट लायसन्स’ तात्काळ रद्द करून त्यांची दुकाने सील करावीत, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.

सुधारित मोटर वाहन कायद्याच्या कलम १९९(अ) [Section 199A] नुसार, कोणत्याही अल्पवयीन मुलाने सार्वजनिक रस्त्यावर गाडी चालवल्यास त्याच्या पालकांना थेट दोषी धरून ३ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि २५,०००/- रुपये दंडाची कडक तरतूद आहे. तसेच संबंधित मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणताही चालक परवाना (Driving License) दिला जात नाही. कोपरगाव पोलिसांनी अशा गाड्या रस्त्यावर दिसताच त्या जागीच जप्त (Seize) करून निष्काळजी पालकांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून पुढील १० दिवसांत शहरातील अंतर्गत रस्त्यांवर धावणाऱ्या डर्ट बाईक्सवर जप्तीची कडक मोहीम राबवावी. जर विनाविलंब कठोर कारवाई सुरू झाली नाही, तर ‘माझा गाव माझा अभिमान, कोपरगांवकर’ संघटना कोपरगावच्या समस्त नागरिकांच्या जीविताच्या रक्षणार्थ पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेसमोर तीव्र लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन व उपोषण करेल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे