आरोग्य व शिक्षण

आयुर्वेदाला आता जगभरातुन मागणी – डॉ रामदास आव्हाड

आयुर्वेदाला आता जगभरातुन मागणी – डॉ रामदास आव्हाड

कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ रामदास आव्हाड व श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ सतीश भट्टड यांना नुकतेच नेपाळ सरकारच्या नॅशनल आयुर्वेदा ट्रैनिंग अँड रिसर्च सेंटर तर्फे आमंत्रित करण्यात आले होते. दि 18 एप्रिल ते 20 एप्रिल, या तीन दिवसीय कार्यशाळेत नेपाळ देशातील 70 जिल्ह्यापैकी 50 जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या सर्व डॉक्टर्सना आयुर्वेद पंचकर्माचे ट्रेनिंग देण्याचे महत्वपूर्ण कार्य भारतातील या दोन आयुर्वेदाचार्यांनी केले. या कार्यशाळेचे उदघाटन त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ देवबहादूर व डॉ धनिकलाल यांच्या हस्ते झाले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ राम आधार यादव यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. उदघाटन सत्रामध्ये डॉ रामदास आव्हाड यांनी आयुर्वेदाचे महत्व विशद करतांना त्या तीन दिवसात देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ देवबहादूर यांनी भारताचे जगातील महत्व अभिमानाने सांगतांना भारताचं आयुर्वेद हे शास्त्र जगाला दिलेली देणगी असल्याचे टाळ्यांचा गजरात सांगितले. भारत हा नेपाळचा मोठा भाऊ असल्याचे सांगत कोरोना महामारीत 10 लाख वॅक्सीन नेपाळ देशाला मोफत देत मोठ्या भावाची कामगिरी पार पाडली असे सांगितले. डॉ रामदास आव्हाड व डॉ सतीश भट्टड यांच्या आगमनाने उत्साहित झालेले व निमंत्रणापेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेले डॉक्टर्स याची साक्षी देत असल्याचेही त्यांनी सांगितले .या तीन दिवसात पंचकर्माच्या विविध विषयांवर डॉ आव्हाड यांची 5, डॉ सतीश भट्टड यांची 3 व डॉ रामदास आव्हाड यांची द्वितीय कन्या डॉ रिद्धी आव्हाड यांची 2 व्याख्याने झाली. दिवसभरात चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात पंचकर्माचे विविध डेमॉन्स्ट्रेशन दाखविण्यात आले. पन्नासहून अधिक आत्ययिक अवस्थेतील रुग्णांची तपासणी व चिकित्सा देखील डॉ रामदास आव्हाडांनी केली. सांगता समारंभामध्ये डॉ रामदास आव्हाड, डॉ सतीश भट्टड व डॉ रिद्धी आव्हाड यांना आकर्षक स्मृती चिन्ह व विशेष सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सरकारी डॉक्टरांनी प्रतिक्रिया स्वरूप बोलतांना तीन दिवसात मिळालेल्या ज्ञानाचा व त्या प्रत्यक्ष कर्मामुळे किती तरी अधिक आत्मविश्वास वाढल्याचे सांगतांना पुढील वर्षी पुन्हा डॉ आव्हाडांच्या टीमला निमंत्रित करण्यात यावे अशी मागणी संस्थेच्या अध्यक्षांना केली. डॉ रामदास आव्हाडांनी त्यांची मागणी मान्य करत ज्या आयुर्वेदामुळे आज या स्थानापर्यंत पोहोचलो त्या आयुर्वेदाच्या प्रचार – प्रसारासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. नेपाळ येथील प्रसिद्ध माध्यमांनी देखील ” नेपाळच्या जनतेच्या आरोग्यासाठी भारताचे आयुर्वेद मदतीला “या शीर्षकाखाली वार्ताकन केले. नगर जिल्ह्यातील डॉ रामदास आव्हाड व डॉ सतीश भट्टड यांच्या देशा बाहेरील आयुर्वेदाच्या या कार्याबद्दल सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे