रस्ते विकास योजनेत कोपरगाव मतदारसंघातील रस्त्यांचा समावेश करा ना. आशुतोष काळेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या रस्त्यांचा रस्ते विकास योजना सन २०२१ ते २०४१ मध्ये समावेश करावा अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.दिलेल्या निवेदनात ना.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याची रस्ते विकास योजना सन २००१ ते २०२१ संपुष्टात आलेली आहे. या योजनेत समाविष्ट नसलेल्या व कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचा विकास होणे गरजेचे असून या सर्व रस्त्यांचा रस्ते विकास योजना सन २०२१ ते २०४१ मध्ये समावेश करावा.तसेच कोपरगाव मतदार संघातील विविध रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या रस्त्यांसाठी विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत निधी देण्यात यावा अशीही मागणी ना. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात ना. रविंद्र चव्हाण यांच्याकडे यावेळी केली. सदर मागणीस ना. रविंद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांचा विकास होण्यासाठी या सर्व रस्त्यांचा रस्ते विकास योजना सन २०२१ ते २०४१ मध्ये समावेश करण्याची ग्वाही दिली आहे.तसेच कोपरगाव मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे अशी माहिती ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.




