आरोग्य व शिक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद; कोपरगाव तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांनी पाहिला ऑनलाईन कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद; कोपरगाव तालुक्यात नऊ हजार विद्यार्थ्यांनी पाहिला ऑनलाईन कार्यक्रम
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव : दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधला. कोपरगाव शहरातील एस.एस.जी. एम. महाविद्यालय, के. जे. एस. महाविद्यालय तसेच तालुक्यातील ६० विद्यालयांमध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कोपरगाव मतदारसंघात राबविण्यात आला.

यावेळी एस.एस.जी. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य आर. आर. सानप, के.जे. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. यादव, उपप्राचार्य डी. एस. सोनवणे, संतोष पगारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात,तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष डी.आर.काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर,विजयराव आढाव,जगदीश मोरे, मुकुंदमामा काळे,प्रशांत वाबळे,राजेंद्र औताडे,सुनील कदम,कानिफनाथ गुंजाळ,चिमाजी दैने, दादाभाऊ नाईकवाडे, किरण सुपेकर, समीर सुपेकर, नाईकवाडेसर, वाघ सर, बुधवंत सर, बालवे मॅडम, शेडगे सर, भागवत सर, रणधीर सर आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी व कोणत्याही समस्येला घाबरू नये. तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला दिला.पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मुलांना वेळेच्या नियोजनाविषयी काही कानमंत्र दिले आणि नियोजनाचे महत्व सांगून महत्त्वाच्या टिप्सही दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ते आधीच माहिती असते. त्यानुसारच आपण आपले नियोजन करू शकतो. मात्र, त्यात नेमके आधी काय करावे, सुरुवात कुठून करावी हे समजत नाही. त्या विचाराने आपण गोंधळून जातो आणि थकवा जाणवतो. आपल्याला कामाचा थकवा येत नाही. पण एवढी कामे करायची आहेत, या विचारानेच आपण दमतो. त्यामुळे कामांची वाटणी करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगोदर अभ्यासाचे नियोजन करावे. वेळेचे महत्त्व आणि आपल्याला कोणत्या विषयात आवड आहे हे लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आई दिवसभर किती काम करते याचे निरीक्षण करा. ती वेळेला किती महत्त्व देते आणि कामाचे नियोजन कसे करते हे नीट बघा. त्यानुसार सूक्ष्म नियोजन करून फ्रेश मुडने नीट अभ्यास करा. परीक्षेच्या काळात कसलाही ताण घेऊ नका. विद्यार्थी म्हणजे देशाचे भावी नागरिक आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे. कॉपी न करता परीक्षेचा कसलाही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असा मोलाचा सल्ला देऊन पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

यावेळी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या,लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विचार करून ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणारे पंतप्रधान मा. श्री.नरेंद्रजी मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहता यावे, यासाठी सन २०१८ पासून ‘परीक्षेवर चर्चा’ (परीक्षा पे चर्चा) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदीसाहेब हे दरवर्षी परीक्षेपूर्वी विद्यार्थी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम असून, त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतील ‘परीक्षेवर चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला. या चित्रकला स्पर्धेसाठी जी-२०-जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणामध्ये भारत नंबर १, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या विविध योजना, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योग दिन-मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, बेटी बचाओ, बेटी पढाओ, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला-मोदीजींचा संवेदनशील निर्णय असे दहा वेगवेगळे विषय ठेवण्यात आले होते. या उपक्रमात कोपरगाव तालुक्यात चार हजारांवर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.



