माजी विद्यार्थी उद्योजक श्री. विशाल राऊत व सौ. कावेरी राऊत यांचा सत्कार
माजी विद्यार्थी उद्योजक श्री. विशाल राऊत व सौ. कावेरी राऊत यांचा सत्कार
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगांव – स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील माजी विद्यार्थी उद्योजक श्री. विशाल राऊत व सौ. कावेरी राऊत यांना नुकतेच बहुजन ग्रामविकास सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श उद्योजक व उद्योजिका पुरस्काराने महाराष्ट्र भवन, दिल्ली येथे विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्री. विशाल राउत हे कोपरगाव येथील रहिवाशी असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात पूर्ण झालेले आहे. त्यांच्या उद्योजक क्षेत्रातील जडणघडणीत या महाविद्यालयाचे महत्वाचे योगदान मानले जाते. संस्कृती पापड उद्योग समूहाच्या माध्यमातुन त्यांनी कोपरगांव तालुक्यात आपला नावलौकिक मिळविलेला असुन महाविद्यालयातील अनेक नव-तरुणांना रोजगाराच्या संधी व प्रेरणा देण्याचे काम सतत केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांने मिळविलेल्या या यशाबद्दल के.जे.सोमैया महाविद्यालयात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, कोपरगांव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अजय गर्जे, संस्थेचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे यांनी राउत परिवाराचे गौवोद्गार करतांना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या या महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर पुणे विद्यापीठात नावलौकिक मिळविलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालय करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. श्री. विशाल राऊत सारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांने या महाविद्यालयातुन आपले शिक्षण पूर्ण करून आज संस्कृती पापड उद्योग क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेले आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांला प्रतिष्ठेच्या आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचा आम्हाला अभिमान वाटतो. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ही उद्योजक श्री. विशाल राऊत व सौ. कावेरी राऊत यांचे अभिनंदन केले. श्री. राउत परिवाराला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल परिसरातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






